गांधी मैदान, बावडा व दुधाळी पॅव्हेलियनच्या विकासासाठी १८ कोटीचा निधी द्या : आमदार चंद्रकांत जाधव यांची मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी
कोल्हापूर/प्रतिनिधी : गांधी मैदान, बावडा व दुधाळी पॅव्हेलियनच्या या तिन्ही मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज मंत्रालयात मंत्री सुनील केदार यांची भेट घेऊन आमदार चंद्रकांत जाधव यांनी निवेदन दिले. यावेळी मंत्री केदार यांनी कोल्हापूरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.
निवेदनातील माहिती अशी, महाराष्ट्र राज्यात खेळाडू व क्रिडा संस्कृतिला चालना देणारे शहर म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. देशाच्या विविध भागातील खेळाडू कोल्हापूरमध्ये सरावासाठी येतात. कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी, हॉकी, बास्केटबॉल, स्फॉटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, रबी, तलवारबाजी, मैदानी स्पर्धा ( अॅथलटीक्स) अशा सर्व क्रिडा प्रकारात कोल्हापूर राज्य, देशासह जगात चमकले आहे. कोल्हापूरातील क्रिडा संस्कृतीला चालना देण्यासाठी खेळाडुंना प्रोत्साहन व सरावासाठी पाठबळ देणे गरजेचे आहे व राज्य सरकारचे कर्तव्य आहे. यासाठी मैदानाचा सर्वांगीण विकास करणे गरजेचे आहे.
क्रिडा प्रशिक्षण, क्रिडा विज्ञान, क्रिडा तंत्रज्ञान, क्रिडा व्यवस्थापन आणि आधुनिक क्रिडा सुविधा खेळाडुंना मैदानावर उपलब्ध झाल्यास, खेळाडुंना कसून सराव करता येईल. सराव चांगला झाला तरच खेळाडुकडून विविध स्पर्धेत चमकदार कामगिरी होईल. यामुळे कोल्हापूरातील गांधी मैदान, बावडा व दुधाळी पॅव्हेलियन या तिन्ही मैदानाचा सर्वागीण विकास करावा, अशी मागणी खेळाडू व क्रिडा प्रेमी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे या तिन्ही मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी व मैदानात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रत्येक मैदानास ६ कोटी प्रमाणे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली आहे.
कोल्हापूरातील खेळाडूमध्ये गुणवत्ता आहे. खेळाडूंना सरावासाठी उत्तम सुविधा मिळाल्या, तर कोल्हापूरचा खेळाडू जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतो. यामुळेच मैदानाच्या विकासासाठी सरकारकडे निधीची मागणी केली असून, मंत्री सुनिल केदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार जाधव यांनी सांगीतले.