बस्तवडेचे भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादीत – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार
कागल/प्रतिनिधी : बस्तवडे ता. कागल येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कागलमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार झाला.यावेळी अश्रू पाटील, लखन कांबळे, अमृता माळी, रामचंद्र लोहार, निखिल कांबळे, रामचंद्र कांबळे, आनंदा भोसले, विकास कांबळे, प्रसाद माळी, मारुती कांबळे, सुमित कांबळे, राहुल लोहार, रमेश पाटील या प्रमुखांसह कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला.यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, बस्तवडेच्या कार्यकर्त्यांनी आपल्यासह पक्षावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्येष्ठ कार्यकर्ते अश्रू पाटील हे गेली ३६ वर्षे राजे गटाचे प्रमुख होते. सायकल चिन्ह असल्यापासून ते राजे गटाची धुरा पाहत होते. निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. लखन कांबळे हे समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशापासून म्हणजे कागल तालुक्यामध्ये भाजपची पहिली शाखा काढणारे प्रमुख होते. यावेळी लखन कांबळे म्हणाले, विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना इंग्लंडला जाण्यावेळी राजर्षी शाहू महाराज यांनी घरी येऊन स्कॉलरशिप दिली होती. मात्र, घराण्याचे जनक म्हणतात त्यांनी मात्र मी बस्तवडे ग्रामपंचायतला अपक्ष उभे राहिलो म्हणून चार कामगारांच्या चुलीमध्ये पाणी ओतले. आजपासून कागल तालुक्यामध्ये प्रत्येक गावातून या राजे गटाला गळती लागण्याचे काम सुरू झालेले आहे. ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ गोरगरीब व दिनदलितांचे कैवारी आहेत. शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ राहून पक्षवाढीसाठी जीवाचे रान करू.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर, किरण पाटील, शिवाजी पाटील, गंगाधर शिंत्रे, प्रकाश शिंदे, सुरेश माळी, शरद नरके, सागर वांगळे, प्रकाश सुतार आदी प्रमुख उपस्थित होते.