मुकुल माधव फाउंडेशनकडून कराड तालुक्यातील पीएचसी ला ऑक्सिजन मशीन प्रदान
कराड/प्रतिनिधी : फिनोलेक्स पाईप्सची सी एस आर संस्था मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५ ऑक्सिजन कॉन्संट्रेटर मशीन माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, फिनोलेक्स पाईप्स चे संतोष शेलार यांच्यासह कराड दक्षिण मधील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, गेल्या काही वर्षांपासून सातारा जिल्ह्यामध्ये फिनोलेक्स पाईप्स ची सीएसआर संस्था मुकुल माधव फाउंडेशन शैक्षणिक, आरोग्य, जलसंधारण क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत आहे विशेषत: सातारा जिल्ह्यातील सेरेब्रल पाल्सी ग्रस्त मुलांसाठी या संस्थेने फिजिओथेरपी सेंटर सुरू करून त्या त्या मुलांना व्हीलचेअरचे वाटप केले आहेत तसेच डॉक्टरांच्या तपासणीवरून गरज आहे त्यांची शस्त्रक्रिया चांगल्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा करण्यात आल्या आहेत. याचसोबत शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा जिल्हा परिषदांच्या शाळेसोबत अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम मुकुल माधव फाउंडेशनने राबविले आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेली मुकुल माधव फाउंडेशन हि संस्था कोरोना महामारीत सुद्धा समाजसेवेत अग्रेसर आहे. गेल्या वर्षी आलेल्या कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात तसेच राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मास्कचे वाटप मुकुल माधव फाउंडेशन कडून करण्यात आलेले आहे याहीवर्षी कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांसाठी ग्रामीण क्षेत्रांमध्ये जिल्हा परिषदेच्या मागणीनुसार ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन सातारा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यामधील ५ मशीन कराड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राला आज देण्यात आले.
समाजातल्या प्रत्येक स्तरापर्यंत फिनोलेक्स पाईप्सचे सामाजिक योगदान योग्य पद्धतीने पोहचेल यासाठी मुकुल माधव फाउंडेशन च्या व्यवस्थापकीय संचालिका रितू छाब्रिया यामध्ये विशेष लक्ष देऊन काम करतात, त्या करीत असलेले हे काम अतिशय उल्लेखनीय आहे.