गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्तापासूनच बंद करा – नवीद मुश्रीफ यांची सूचना
पहिल्याच बैठकीपासून काटकसरीच्या कारभाराची नांदी
संचालकांचे हारतुरे, पुष्पगुच्छ, पाण्याच्या बाटल्यानाही पायबंद
घरातच बसून पगार घेणाऱ्यांची होणार अडचण
कोल्हापूर/प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाचे ओपल हॉटेलमधील खाते आत्ता या क्षणापासूनच बंद करा, अशी सक्त सूचना नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांनी कार्यकारी संचालकाना केली. तसेच, संचालकांसाठी आणले जाणारे हारतुरे, पुष्पगुच्छ, आणि पाण्याच्या बाटल्यानाही तात्काळ पायबंद घाला, असेही त्यांनी बजावले.
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या नूतन संचालकांचा कार्यालय प्रवेश व बैठक असे या बैठकीचे स्वरूप होते. कार्यालय प्रवेशापूर्वी नूतन संचालकांनी गोकुळ दूध संघाचे संस्थापक कै. आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक झाले. कार्यकारी संचालक श्री. डी. व्ही. घाणेकर यांनी ही बैठक बोलावली होती. स्वागत व प्रास्ताविकात त्यांनी संघाचे कामकाज, कारभार व दूध संकलन -वितरण याविषयी सविस्तर माहिती संचालक मंडळाला दिली.
या बैठकीला नूतन सत्ताधारी संचालक मंडळातील विश्वास उर्फ आबाजी नारायण पाटील, अरुणराव डोंगळे, नवीद मुश्रीफ, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील, शशिकांत पाटील- चुयेकर, रणजीतसिंह के. पी. पाटील, अजित नरके, डाॅ. सुजित मिणचेकर, प्रा. किसन चौगुले, बाबासाहेब पाटील, एस. आर. पाटील (चिखलीकर), अभिजीत तायशेटे, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बयाजीराव शेळके, प्रकाश पाटील आदी नूतन संचालक उपस्थित होते. चौघे विरोधी नूतन संचालक अनुपस्थित राहिले.
या बैठकीत ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी याआधीच जाहीर केल्याप्रमाणे दूध उत्पादकांना लिटरला दोन रुपये दरवाढ देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. तसेच दूध संघामार्फत ऑक्सिजन प्रकल्प उभारण्याची घोषणा या दोन्ही नेत्यांनी केली आहे. त्याबाबतही नियोजन व चर्चा झाली. दूध संघाच्या कामावर गैरहजर राहून पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना गंभीर व निर्वाणीचा इशारा या बैठकीत देण्यात आला आहे. तो म्हणजे, ऊद्यापासुन कामावर हजर राहा. अन्यथा; पुढच्या महिन्यापासून पगार मिळणार नाही.
चौकट
विश्वस्त आहोत….. मालक नव्हे.
याबाबत नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही गोकुळ दूध संघाचे संचालक झालो आहोत, मालक नव्हे. दूध उत्पादक शेतकरीच या संघाचे मालक आहेत. दूध उत्पादकांनी आपल्या पोरा बाळांच्या तोंडचे काढून दूध संघाला घातले आहे. त्या पैशावर संचालक म्हणून आम्ही चैन्या करत बसणं, हे आमच्या नीतीमत्तेत बसत नाही. या दूध संघात विश्वस्तांच्या भूमिकेतूनच काम करू, मालक म्हणून नव्हे!