महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

महान शिल्पकार बी. आर. खेडकर : कलेचा अमूल्य वारसा

शिल्पकार बी. आर. खेडकर यांच्या शताब्दी महोत्सवानिमित्त प्रासंगिक लेख

मातीत जन्मलो मी….,
ही मातीच झाली माझी मैत्रीण ….,
दिला तिला आकार सूंदर मूर्तीरुपाने….,
अखेर ती मातीच राहील माझ्या संगती…. शिल्पकार बी आर खेडकर यांच्या या ओळी त्यांची कलासक्ती सांगतात. कलेला अक्षरशः वाहून घेतलेला एक अवलिया म्हणजे महाराष्ट्रातील सूप्रसिध्द शिल्पकार बी आर खेडकर तथा आप्पासाहेब….“                      कलाकार आपल्या कलेतून सदैव जिवंत राहतो….” तसेच ज्येष्ठ शिल्पकार बी आर खेडकर तथा आप्पासाहेब सदैव कलाक्षेत्रात जिवंत राहिले आहेत. १२ ऑगस्ट १९२६ ते १२ ऑगस्ट २०२६ आज त्यांच्या शताब्दी पूर्ण होत आहे. शिल्पकलेचा वारसा जपणारे महान शिल्पकार आपल्यात नसले तरी कलेने जिवंत आहे. शिल्पकलेमुळे समाजाला समृद्ध करणाऱ्या अनेक कलाकारांमध्ये शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे नाव आदराने घेतले जाते.
बी. आर. खेडकर यांनी आपल्या कलाकृतींमधून सौंदर्य, भावना आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाफ साधला. मातीला कल्पकतेने आकार देऊन त्यांनी अनेक संस्मरणीय शिल्पे साकारली. त्यांच्या शिल्पांमध्ये बारकावे, प्रमाणबद्धता आणि कलात्मकता यांचा उत्कृष्ट संगम दिसून येतो. त्यांच्या कार्यामुळे शिल्पकलेला नवी ओळख मिळाली आणि अनेक नवोदित कलाकारांना प्रेरणा मिळाली.                                             शिल्पकार बी. आर खेडकर उर्फ आप्पासाहेब यांचा
जन्म १२ ऑगस्ट १९२६ रोजी राजगुरूनगर खेड येथे झाला. आई-वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले. त्यांच्या मोठ्या भावाने त्यांचा सांभाळ केला. इयत्ता दुसरी झालेले आप्पासाहेब लहान असताना किल्ल्यावरची लहान लहान चित्रे करीत असत मातीमध्येच त्यांचे मन रमत असे. थोडे मोठे झाल्यावर त्यांनी गणपती व त्यांचे देखावे करण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्री मध्ये पाऊल ठेवले. मोगले आजम, पाकीजा सारख्या चित्रपटांच्या सेट उभारणीसाठी शिल्पकार म्हणून कामही केले. बी. आर. खेडकर यांनी आजिवन शिल्पकलेला वाहून घेतले होते. वयाच्या ५ वर्षांपासून मातीत हात रुतवलेल्या या कलाकारांने ९० वर्षापर्यंत ५०० हून अधिक पुतळे साकारून त्यांना आपल्या कलेतून जिवंत केले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुतळे साकारले आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यांची संख्या मोठी आहे.
महाराष्ट्रातील विविध प्रमुख शहरांमध्ये तसेच कर्नाटकात त्यांच्या कलाकृती आजही पाहायला मिळतात. तसेच त्यांच्या अनेक कलाकृती परदेशी देखील आहेत. त्यांच्या शिल्पांमधून संबंधित महापुरुषांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कर्तृत्व प्रभावीपणे प्रतिबिंबित होते. त्यांच्या कलाकृतींमध्ये बारकावे, प्रमाणबद्धता आणि वास्तवदर्शीपणा यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात उभारण्यात आलेला अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ही त्यांच्या कलेची विशेष ओळख आहे. हा पुतळा पाहताना छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, नेतृत्व आणि स्वराज्याची प्रेरणा यांचा प्रत्यय येतो. बी. आर. खेडकर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून इतिहास आणि वर्तमान यांच्यात सुंदर सेतू निर्माण केला. त्यांचा कलावारसा जपणे, त्यांच्या कार्याची ओळख नव्या पिढीला करून देणे आणि शिल्पकलेची प्रेरणा पुढे नेणे हीच त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना खरी आदरांजली ठरेल.
शिल्पकलेच्या क्षेत्रात आपल्या प्रतिभेचा अमिट ठसा उमटविणारे महान शिल्पकार बी. आर. खेडकर यांचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. त्यांच्या जन्मशताब्दी पूर्ती निमित्त त्यांच्या कलाप्रवासाचे स्मरण करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही अभिमानाची बाब आहे. बी. आर. खेडकर यांनी नवोदित शिल्पकारांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यासाठी शिल्पकलेच्या कार्यशाळा , स्पर्धा घेण्यात याव्यात तसेच त्यांच्या कलागुणांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने “शिल्पकार बी .आर. खेडकर कला प्रतिष्ठान” या नावे फॅमिली ट्रस्ट स्थापन केला. यातून पहिली कार्यशाळा शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे घेण्यात आली. या शताब्दी वर्षात अशा विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुणे ,कोंढवा कात्रज येथे खेडकर यांनी केलेल्या विविध शिल्पाकृती पुतळ्यांचे कलादालन उभे करण्यात आले आहे. बी आर खेडकर यांच्या नऊ कन्या त्यांच्यापैकी सीमा खेडकर यांनी वडिलांच्या कलेचा वारसा जोपासला आहे.

– तृप्ती पुरेकर, कोल्हापूर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *