सुप्रिम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय हिंदू, शीख आणि बौद्धांनाच अनुसूचित जातीचा दर्जा
ख्रिश्चन, मुस्लिमांना अनुसूचित जातीचा दर्जा देता येणार नाही
मुंबई/प्रतिनिधी : सुप्रिम कोर्टाने आज २४ मार्च २०२६ मंगळवारी एक महत्त्वपूर्ण निकाल दिला असून, हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानले जाऊ शकत नाही. यात न्यायालयाने पुढे असेही म्हटले आहे की, दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा गमावला जातो.
न्यायमूर्ती पी. के. मिश्रा आणि एन. व्ही. अंजारीया यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे यात असे म्हटले आहे की, ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करणारा दलित व्यक्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या उल्लंघनाचा दावा करू शकत नाही. ‘बार अँड बेंच’च्या अहवालानुसार, न्यायालयाने निकाल दिला, “हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त इतर धर्माचे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अनुसूचित जातीचा सदस्य मानले जाऊ शकत नाही.
दुसऱ्या धर्मात धर्मांतर केल्यास अनुसूचित जातीचा दर्जा गमावला जातो.” तसेच कलम ३ अंतर्गत अनुसूचित जातीचा सदस्य मानल्या न गेलेल्या व्यक्तीला संविधानांतर्गत किंवा कोणत्याही कायद्यांतर्गत किंवा राज्य विधानमंडळांतर्गत कोणताही वैधानिक लाभ, संरक्षण, आरक्षण किंवा हक्क प्रदान केला जाऊ शकत नाही, ही बंदी संपूर्ण आहे.”

