तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ चे स्वप्न लवकरच सत्यात : प्रा. टी जी सीताराम

आय.एस.टी. ई.’ ग्लोबल टेक कॉन २०२६’ चा शुभारंभ

-डी. वाय. पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी आणि आय.एस.टी. ई. नवी दिल्लीकडून आयोजन

कोल्हापूर/प्रतिनिधी:
भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे ‘विकसित भारत’ हे आता स्वप्न राहिलेले नसून लवकरच ते सत्यात उतरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (ए. आय. सी. टी. ई) चे माजी चेअरमन प्रा. टी जी सिताराम यांनी केले. डी वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी. ई.) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आय.एस.टी. ई. ग्लोबल टेक कॉन २०२६’मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात या जागतिक परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व प्रा. टी. जी. सिताराम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, आय.आय. आय. टी.एम. ग्वाल्हेरचे संचालक प्रा. एस. एन. सिंह,कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, आय.एस. टी. ई.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, महाराष्ट्र गोवा अध्यक्ष डॉ. रणजीत सावंत, कार्यकारी समिती सदस्य डॉ. महादेव नरके, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.क्यू.ए.सी. डायरेक्टर डॉ. शिवानंद शिरकोले आदी उपस्थित होते.
प्रा. सीताराम म्हणाले, रिसर्च, इनोव्हेशन, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट यावर भर दिला तर भारत जगाला विकासाची नवी दिशा देऊ शकेल. ए. आय. असो किंवा कोणतेही नवे तंत्रज्ञान त्याचा स्वीकार करून अधिक चांगले काम करा. आपण जेवढे सक्षमपणे समस्या सोडवण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तेवढे देशाचे भविष्य उज्वल बनेल. तंत्र शिक्षण हे केवळ पदवीप्रथम मर्यादित नसून समस्या सोडवणारे उद्योजकता घडवणारे असावे. नोकरी त्यातून नोकरी देणारे विद्यार्थी घडावेत यासाठी भर देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय पाटील ग्रुपच्या विस्ताराबाबत माहिती देऊन तंत्रशिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला.माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या तीन गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि युएसए कडून आपण बरेच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आत मध्ये विकसित केली पाहिजे.
डॉ. जी डी. यादव म्हणाले, आपल्याकडे खूप संधी व अनेक क्षमता आहे. शैक्षणिक पॉलिसी मध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे.डॉ. प्रतापसिंह देसाई म्हणाले,.नवीन पिढीमध्ये क्षमता आहे, नवनवीन संकल्पनातून हे जीवन बदलू शकतात. नवनवीन गोष्टी तंत्रज्ञान शिकणे, आत्मसात करण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे याचा फायदा घ्यावा.
प्रा. एस एन सिंग म्हणाले,
तंत्रज्ञान गतीने बदलत आहे. त्या पद्धतीचे शिक्षण आणि अशा परिषदांची गरज आहे. ए. आय. मुळे नोकऱ्या जातील हा निव्वळ गैरसमज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात टाईम मॅनेजमेंट हा यशाचा मार्ग आहे.स्टार्ट अप मार्गदर्शक सचिन कुंभोजे म्हणाले, अभियांत्रिकी करत असतानाच स्टार्टअप वर भर द्यावा. त्या माध्यमातून विकासाला अधिक चालना मिळेल. प्रा. शुभदा यादव, प्रा. शारोन काळे
सूत्रसंचालन केले. डॉ. शिवानंद शिरकोले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *