दाम दुप्पटचे आमिष दाखवून १२ कोटी पेक्षा जास्त रक्कमेची आर्थिक फ़सवणूक प्रकरणी फरारी आरोपीला अटक
कोल्हापूर/प्रतिनिधी : विविध कंपन्या आणि फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली ४५ दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम दाम दुप्पटीचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करून फरार झालेला मुख्य आरोपी राजेंद्र भिमराव नेर्लीकर याला आर्थिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली.त्याला इचलकरंजी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १८ तारखे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या गुन्हयांतील मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर आणि त्याचा मुलगा बालाजी नेर्लीकर हा फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये पारंगत होते.त्यांनी गुंतवणूकदारांना ४५ दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम दाम दुप्पट देतो असे सांगून फिर्यादी विनायक पाटील यांच्यासह इतर गुंतवणूकदारांची १२ कोटी ३५ लाख ३५ हजार १३८.रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याने फिर्यादी विनायक पाटील यांनी हुपरी पोलिस ठाण्यात दि.२२/१०/२४ रोजी फिर्याद दिल्याने हुपरी पोलिसांनी नेर्लीकर बाप-लेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्हयांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे चालू असताना मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर याचा मुलगा बालाजी नेर्लीकर याला पोलिसांनी अटक केली होती.मात्र मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर हा पसार झाला होता.आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांना दि.१२ ऑक्टोबर २५ रोजी फरार असलेला मुख्य आरोपी राजेंद्र नेर्लीकर याचा ठावठिकाणाची माहिती पोलिस अंमलदार विजय काळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक महेश इंगळे यांच्या निरीक्षणाखाली तपास पथक तयार करून रवाना केले असता राजेंद्र नेर्लीकर हा आदमापूर येथील हॉटेल त्रिशा येथे मिळून आल्याने त्याला अटक केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता,आर्थिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश इंगळे,पोलिस विजय काळे,राहुल गायकवाड,रविंद्र गायकवाड,विपूल माळी आणि चालक सुनिल गावडे यांनी केली.
अटक केलेल्या राजेंद्र नेर्लीकर व बालाजी नेर्लीकर यांच्या कडुन आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असेल तर त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.