कसबा बावडा येथे ८५ लाखांचा ‘ड्रेनेज घोटाळा’! :माजी नगरसेवक सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम
कागदांवर काम पूर्ण दाखवून पैसे उचलले
प्रत्यक्षात शेतकरी व रहिवाशी पुरात : माजी नगरसेवक सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्र. २, कसबा बावडा (पूर्व) येथील जाधव घर ते बडबडे मळा दरम्यान रु. २,४२,९५,०८१/- इतक्या खर्चाच्या ड्रेनेज पाइप टाकण्याच्या कामासाठी निविदा क्र. २४ अन्वये टेंडर प्रक्रिया केली होती. यानुसार संबंधित ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली.
मात्र, वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदाराने केवळ मर्यादित प्रमाणातच प्रत्यक्ष काम केल्याचे निदर्शनास आले असून, त्यांनी एकूण ५ टप्यात बिलाची मागणी केली त्यापैकी ४ बिले त्यांना महानगरपालिके कडून अदा करण्यात आली आणि उर्वरित काम न करता ५ व्या बिलासाठी बोगस मोजमाप पुस्तक तयार करून, त्याआधारे अनधिकृतरित्या बिलाची अंदाजे रक्कम रु.८५.००/-लाख महापालिकेने संबंधित ठेकेदारास अदा केली आहे, हि अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे असे आज
माजी नगरसेवक सत्यजित (नाना) शिवाजीराव कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.यात दोषी असणाऱ्यावर आयुक्त यांनी कारवाई करावी अशी मागणी नाना कदम यांनी केली आहे.यावेळी माजी नगरसेवक सुनील कदम उपस्थित होते.
या भ्रष्ट कारभारामुळे कसबा बावडा परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आणि नागरिकांच्या घरांमध्ये ड्रेनेजचे पाणी शिरून शेतीचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत आहे. कोल्हापूर शहरातील अनेक जनआंदोलनात कृती समितीच्या माध्यमातून स्व. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा काम केले आहे, आज काही लोक कृती समितीच्या नावाखाली चांगल्या कामांना व चांगले काम करणाऱ्या लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, त्यांना अश्या गोष्टी दिसत नाहीत का? कि ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करतात, हे जाणून घेणे गरजेचे वाटते असेही नाना यांनी म्हटले आहे.
तसेच या संपूर्ण प्रक्रियेकडे महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे स्पष्टपणे जाणवते. यामुळे शासनाच्या निधीची अफरातफर झाल्याचे तसेच कोल्हापूर महानगरपालिकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होते. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून, यासंदर्भातील सर्व पुरावे मी मा. प्रशासकसो यांना दिले त्यावेळी त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्ये सहभागी असलेल्या ठेकेदार आणि संबंधित महापालिका अधिकाऱ्यांविरोधात सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी नाना कदम यांनी केली आहे. या बोगस बिला द्वारे अदा केलेली रक्कम वसूल करण्यात यावी व कसबा बावडा येथील नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी नाना कदम यांनी केली आहे.







