सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये विशेष सूट द्या; आमदार राजेश क्षीरसागर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुख्यमंत्र्यांकडून ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना कार्यवाही करण्याच्या सूचना
कोल्हापूर/प्रतिनिधी : सालाबाद प्रमाणे याही वर्षी संपूर्ण राज्यामध्ये पुढील महिन्याच्या २५ तारखेपासून गणेश उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मार्फत विघ्नहर्ता गणरायाच्या मूर्ती बसवल्या जातात तसेच अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये विशेष सूट द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी सदर बाब ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवली आहे.
आमदार क्षीरसागर यांनी पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सालाबाद प्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे, सदर उत्सवाला महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून जाहीर केला आहे.
गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक गणेश मंडळाकडून तात्पुरत्या स्वरूपाचे वीज कनेक्शन घेतले जाते. परंतु शून्य ते शंभर युनिट पर्यंत ₹४.७१ इतकी रक्कम आकारली जाते. आणि शंभर युनिट च्या वरती ₹ १०. २९ ते १६. ६४ इतकी ज्या त्या स्थिर आकारानुसार रक्कम आकारली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव काळामध्ये विविध समाज प्रबोधनात्मक देखावे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यामुळे १०० युनिट च्या वरती विजेचा वापर होतो, त्यामुळे येणारे बिल हे मंडळांच्या दृष्टीने परवडणारे नाही, त्यामुळे जी रक्कम शून्य ते शंभर युनिट वीज आकारासाठी आकारली जाते, तीच म्हणजे ₹४. ७१ प्रति युनिट रक्कम गणेश उत्सव काळात विशेष सूट म्हणून १०० युनिट च्या वरील वीज वापरावर स्थिर आकारण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या मागणीची दखल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून ऊर्जा विभागाच्या मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे. यामुळे लवकरच गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना वीज बिलामध्ये सवलत मिळण्याची शक्यता आहे..







