Sunday, February 2, 2025
spot_img
HomePoliticsकाशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा दक्षिण काशी म्हणून कायापालट करू - ...

काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा दक्षिण काशी म्हणून कायापालट करू – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा दक्षिण काशी म्हणून कायापालट करू – सहपालकमंत्री माधुरी मिसाळ

सहपालकमंत्री झाल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर :सर्वप्रथम घेतले देवीचे दर्शन

कोल्हापूर/प्रतिनिधी : “उत्तर प्रदेशातील काशीच्या धर्तीवर कोल्हापूरचा कायापालट करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आई अंबाबाईच्या कृपेने मला ही जबाबदारी मिळाली असून, नगरविकासासह कोल्हापूरच्या विकासाशी संबंधित विविध खात्यांचा कार्यभार माझ्याकडे असून कोल्हापूर आमच्या सरकारच्या प्राधान्यक्रमावर आहे,” असे कोल्हापूरच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांनी स्पष्ट केले.
सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रथमच कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मिसाळ यांनी अंबाबाई मंदिरात जाऊन देवीचे तसेच मंदीरातील मातृलिंग व श्री दत्तांचे दर्शन घेतले. त्यानंतर नर्सरी बागेतील समाधी स्थळी जाऊन राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन केले.
यानंतर भाजप कार्यालयात त्यांच्या सहपालकमंत्री म्हणून निवडीसाठी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या १०० दिवसांच्या कामाच्या नियोजनात कोल्हापूरच्या प्रश्नांचा समावेश केला आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य दिले जाईल आणि ती लवकर मार्गी लागतील.”
“कोल्हापूरातील लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सर्वानुमते अंबाबाई तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून तो शासनाकडे पाठवल्यास मंजुरी मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही,” अशी ग्वाही मिसाळ यांनी दिली.”भाजपच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. त्या त्या भागात सक्षम कार्यकर्ते असतील, तर बाहेरून किंवा इतर पक्षातून नेते मागवण्याची गरज भासणार नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“कोल्हापूरच्या विकासासाठी प्रत्येक महिन्यातून एक दिवस मी खास राखून ठेवणार आहे. तसेच, कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रमांसह माझ्याकडे यावे,” असे आवाहन त्यांनी केले. आम्ही हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावू , असे त्या म्हणाल्या.भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आपल्या मनोगतामध्ये सह पालकमंत्री म्हणून आपली झालेली नियुक्ती बद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर पदाधिकारी कार्यकर्त्यांना शासकीय कमिट्या, महामंडळ यामध्ये न्याय मिळावा अशी मागणी याप्रसंगी केली. जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी खंडपीठ आयटी पार्क जोतिबा तीर्थक्षेत्र आराखडा असे विषय प्रामुख्याने लवकरात लवकर पूर्ण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली
संघटन सरचिटणीस मकरंद देशपांडे यांनी भाजपा सदस्य नोंदणीचा आढावा घेत १९ फेब्रुवारी पर्यंत मिळालेल्या सदस्य नोंदणीच्या मुदत वाढीमध्ये सर्वांनी जास्तीत जास्त क्षमतेने ही नोंदणी व जिल्ह्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत राहावे असे आवाहन केले.
कार्यक्रमाला भाजपचे संघटनमंत्री मकरंद देशपांडे, चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, भाजप पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राहूल चिकोडे, अशोक देसाई, डॉ राजवर्धन, डॉ स्वाती पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments