शाहू महाराजांच्या प्रचारार्थ आज गांधी मैदान येथे शरद पवार, उद्धव ठाकरेंसह अनेक नेत्यांची शिव-शाहू निर्धार सभा
महायुतीच्या विरोधात तोफा धडाडणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर लोकसभेचे इंडिया, महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारार्थ एक मे रोजी गांधी मैदान येथे भव्य शिव शाहू निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. या सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आहे. महाविकास आघाडीची गांधी मैदानात जंगी सभा होत आहे. या सभेचे नियोजन आमदार सतेज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह अनेक नेते करत आहेत. सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या सभेत पवार आणि ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांच्या तोफा धडाडणार आहेत. हे नेते महायुती आणि उमेदवारांवर जोरदार हल्लाबोल करणार आहेत. या सभेसाठी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांच्यासह इंडिया आघाडीतील, घटक पक्षातील प्रमुख नेते व्यासपीठावर असतील. पाच वाजता सभा सुरु होईल. त्यामुळं सभेपूर्वी कार्यकर्त्यांनी सभेच्या ठिकाणी यावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.