सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, यासह विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत मिळावी – राजेश क्षीरसागर यांची मागणी
मुंबई/प्रतिनिधी : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदती डोंगर, कर्नाटक येथील श्री रेणुका देवीची यात्रा प्रतिवर्षी प्रमाणे येत्या डिसेंबर महिन्यात आली आहे. सदर यात्रेकरिता कोल्हापूर व आसपासच्या परिसरातून लाखो भाविक जात असतात. सदच्या यात्रेकरिता गेली २५ ते ३० वर्षे रेणुका भक्त एस.टी. ने जात आहेत. अलीकडच्या काळामध्ये वाहतुकीच्या नवनवीन सुविधा उपलब्ध असताना देखील सदरच्या यात्रेकरिता एस.टी.ला पसंती दिली जाते. सौंदती यात्रेकरिता शहरातून जवळपास २०० एस. टी. गाड्या प्रासंगिक कराराद्वारे बुकिंग केल्या जातात. या गाड्यांच्या खोळंबा आकारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून भाविकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे काम काहींकडून होत होते. परंतु, रेणुका भक्त संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी केलेल्या मागणी नंतर आपण यात लक्ष घातले असून, तत्कालीन परिवहन मंत्री श्री.दिवाकरजी रावते यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे गेल्या चार वर्षात बसेस वरील खोळंबा आकार आणि गाडीभाडे यामध्ये भरघोस सवलत देण्यात आली आहे. सन २०१८ मध्ये खोळंबा आकारात ९० टक्के कपात करण्यात आली तर प्रतिगाडी एस टी.भाडे रु.५० वरून रु.३४ करण्यात आले होते. सन २०१९ मध्येही एस.टी.महामंडळाकडे केलेल्या पाठपुराव्याने सन २०१८ साली देण्यात आलेल्या सवलती कायम ठेवण्यात आल्या.
यंदा कोरोनाचे संकट पाहता यात्रेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह आहे. परंतु, यात्रा होणार असल्याचे निश्चित झाल्यास, सौंदती यात्रेवरील खोळंबा आकार पूर्ण रद्द करावा, यासह गेल्या चार वर्षात देण्यात आलेल्या सवलतीप्रमाणे विविध करांमध्ये कायमस्वरूपी विशेष सवलत द्यावी, अशी मागणी आज राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी राज्याचे परिवहन मंत्री नाम. श्री.अनिल परब यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, मागील चार वर्षामध्ये मी या गोष्टीमध्ये लक्ष घालून परिवहन मंत्री मा. दिवाकर रावते यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून खरोखरच खोळंबा आकार कमी करण्यास यशस्वी पाठपुरावा केला. सौंदती यात्रा ही सर्वसामान्यांची यात्रा असून, गेल्या चार वर्षात कमी झालेला खोळंबा आकार श्री रेणुका भक्तांना मोठा दिलासा देणारी ही बाब आहे. तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकरजी रावते यांनी या यात्रेकरिता विशेष सवलत म्हणून खोळंबा आकार ९० टक्के कमी तर एस.टी.भाडे प्रतिगाडी रु.५० वरून रु.३४ इतके करून भाविकांना दिलासा दिला होता. त्याचपद्धतीने गतवर्षी एस.टी.महामंडळाकडे केलेल्या विशेष पाठपुराव्यामुळे सौंदती यात्रेतील एस.टी.भाडे आणि खोळंबा आकारात सन २०१८ प्रमाणे विशेष सवलत देण्यात आली होती. त्याच अनुषंगाने यावर्षी यात्रा पार पडणार असल्यास हा खोळंबा आकार पूर्णपणे रद्द करण्यात यावा, अशी मागणी सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
यासह पंढरपूर यात्रेकरिता परिवहन विभागामार्फत विशेष योजना दरवर्षी रावबिली जाते. सौंदती यात्रेकरीतही लाखो भाविक जात असल्याने दरवर्षी या यात्रेकरिता पंढरपूर यात्रेच्या धर्तीवर आपण विशेष योजनेची निर्मिती होण्याबाबत परिवहन विभागाकडून विशेष प्रयत्न व्हावेत. कर्नाटक शासनापेक्षा महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या एस.टी.चे दर कमी असावेत. परमिट फी कमी असावी, सेवा कर पूर्ण माफ करण्यात यावेत, यात्रेकरिता २०० गाड्या राखीव ठेवण्यात याव्यात. यासह भाविकांना देण्यात येणाऱ्या गाड्या सुस्थिती असाव्यात. यात्रा मार्गावर ब्रेकडाऊन गाड्यांही उपलब्ध असाव्यात, अशी मागणीहीराज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी परिवहन मंत्री नाम. अनिल परब यांच्याकडे केली आहे.