डी.वाय. पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाने मिळविला राष्ट्रीय स्तरावर बहुमान
-‘थर्ड आय फॉर ब्लाइन्ड’ला सुवर्णपदक
-राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्पमध्ये यश
कोल्हापूर/प्रतिनिधी : भोपाळ येथील रवींद्रनाथ टागोर विद्यापीठाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्प स्पर्धेत डी.वाय. पाटील कृषी व तंत्रविद्यापीठाच्या द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स इंजिनीरिंग विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक व रोख १५ हजाराचे बक्षीस पटकाविले. ईशा संजय खटावकर, आदित्य राजेंद्र आपटे, केदार राजू पवार या विद्यार्थ्यांनी सेन्सर व आर्डिनो तंत्रज्ञानाचा वापर करत अंधांसाठी बनवलेल्या अनोख्या काठीसाठी विद्यापीठाला हा राष्ट्रीय बहुमान मिळाला आहे. ‘थर्ड आय फॉर ब्लाइन्ड’ ही कल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी अंधव्यक्तींना मदत म्हणून एक अनोखी काठी बनविली आहे. यामध्ये सेन्सर व आर्डिनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये अंधव्यक्तीना कोणाचीही मदत न घेता काठीच्या साह्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येते. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तो अंधव्यक्ती एक बटन प्रेस करून त्याचे लाईव्ह लोकेशन आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहचवू शकतो. या अनोख्या तंत्रज्ञानामुळेच या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला परीक्षकांनी प्रथम क्रमांक दिला. या स्पर्धेसाठी संपूर्ण भारतातून ३५० हुन अधिक प्रकल्प आले होते यामधून डी.वाय.पाटील विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक मिळाला आहे.
या यशाबद्दल कुलगुरू डॉ.के. प्रथापन, कुलसचिव डॉ.जे.ए.खोत, असोसिएट डीन डॉ.संग्राम पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले ” विद्यार्थ्यांची ही कामगिरी खूप अभिमानास्पद आहे. विद्यापीठात फक्त पुस्तकी ज्ञान न देता अनुभवात्मक शिक्षणाची संकल्पना राबवली जात आहे. यापुढे ही यशाची परंपरा कायम ठेवण्यासाठी आम्ही तत्पर राहू”.कुलसचिव डॉ.जे.ए.खोत म्हणाले ” विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफ ने दिलेले योगदान याच्या जोरावरच हे यश संपादन करता आले. यापुढेही या विद्यापीठाची यशस्वी वाटचाल चालू राहील असे बोलून त्यांनी यशस्वी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे अभिनंदन केले.असोसिएट डीन डॉ.संग्राम पाटील म्हणाले ” ही काठी म्हणजे अंधांसाठी आधारवड आहे.आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो या एकमेव भावनेतून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प हाती घेऊन जिद्द, मेहनत व चिकाटी यांच्याजोरावर तो प्रकल्प पूर्णत्वास नेला व त्याला राष्ट्रीय स्तरावर ओळख प्राप्त करून दिली.
विद्यापिठाने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेल्या या यशाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठचे व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यानी सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. या प्रकल्पासाठी प्रा.अरिफ शेख, प्रा.एस.ए. कुंभार, प्रा. प्रीतम महाजन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.