पंचमहाभूत लोकोत्सवाचा चौथ्या दिवशी – अग्नी तत्त्व – संत संमेलन
मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण, तसेच भाविक यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संत यांचा निर्धार
कोल्हापूर/प्रतिनिधी : केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झाले नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही. तरी लाखोंच्या संख्येत असलेल्या मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्यासह समाजाच्या सहभागाने झाडे लावणे, प्रत्येक पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे आणि त्याचा पुर्नवापर करणे, कृषी आधारित शेतीस प्रोत्साहन देणे, अशा गोष्टी यापुढीळ काळात कराव्या लागतील. हा धागा पकडत मठ, आश्रम यांचे अनुयायी, भक्तगण यांच्या माध्यमातून पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा निर्धार पंचमहाभूत लोकोत्सवात साधू-संत यांनी केला. २३ फेब्रुवारीला (अग्नी तत्त्व) पंचमहाभूत लोकोत्सवात प.पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या संत संमेलनात देशपातळीवर साधू-संत, मान्यवर उपस्थित होते. या संमेलनात कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत, तसेच गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘पंचमहाभूतांचा इतक्या व्यापक स्तरावर आजपर्यंत कुणीच विचार केला नव्हता. हे प्रदर्शन शास्त्रज्ञ, विद्यार्थी, नागरिक अशा प्रत्येक स्तरावर लाभ करून देणारे आहे. इथे येऊन माझ्या ज्ञानात भर पडली. भारत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने हे संमेलन म्हणजे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतात होणार्या ‘जी -२०’ संमेलनाच्या दृष्टीनेही हा लोकोत्सव एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे भारत आता विश्वगुरु होण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे.’’
प्रारंभी प्रास्ताविकात स्वामी परमात्मानंदजी महाराज म्हणाले, ‘‘जागतिक तापमानवाढ यांसह जागतिक स्तरावर पर्यावरणविषयी जागृती करण्याचे काम केवळ भारतच प्राधान्याने करू शकतो. या मठावर भरलेले हे संमेलन म्हणजे भारत विश्वगुरु बनण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.’’ आपल्या मार्गदर्शनात प.पू. काडसिद्धेश्वर महास्वामिजी म्हणाले, ‘‘देशभरातील साधू-संत यांनी शेतकर्यांना देशी गाय घेऊन देण्यात साहाय्य करणे, आश्रम स्तरावर कार्यक्रम करतांना त्यात बी-बियाणे भेट म्हणून देणे, आश्रम स्तरावरील पाणी आश्रम स्तरावरच वापरणे, आश्रमात छोटी शेती सिद्ध करणे, उर्जा बचत करण्यासाठी जे जे शक्य ते सर्व कार्यक्रम राबवणे, चांगली शेती करणार्या शेतकर्यांचा सत्कार करणे अशा प्रकारची कामे करण्यात पुढाकार घेऊन ते पंचमहाभूत लोकोत्सवात सहभागी होऊ शकतात.’’पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील संतांनी पर्यावरण जागृतीविषयी मोठे कार्य केले असून अनेक अभंगांद्वारे प्रबोधन केले आहे. आम्ही गेल्या १० वर्षांपासून झाडे लावण्याचे काम करत आहोत. इथे उपस्थित असणार्या सर्वांना मी देशी झाडे लावण्याचा आग्रह करतो.’’ पंढरपूर येथील ह.भ.प. देवव्रत (राणा) विवेकानंद वासकर महाराज म्हणाले, ‘‘या लोकोत्सवाच्या प्रसंगी आम्ही पर्यावरण रक्षणाचे काम करण्याचे शपथ घेतो, तसेच अशा प्रकारचा पंचमहाभूत लोकोत्सव जिथे जिथे होईल, तिथे तिथे वारकरी संप्रदाय हे कार्य करण्यात पुढाकार घेईल, अशी ग्वाही या प्रसंगी देतो.’’
आपल्या मार्गदर्शनात मंजीत सिंह जी म्हणाले, ‘‘या कार्यात महिला आणि युवक यांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे.’’ गुंटूर येथील जगद्गुरु श्री. शिवाराथी देशिकेंचा महास्वामीजी या पंचमहाभूत लोकोत्सवातील ज्या ज्या गोष्टी कर्नाटक राज्यात आम्हाला करता येणे शक्य आहे त्या त्या आम्ही करू, असे आश्वस्त केले.या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. भैय्याजी जोशी म्हणाले, ‘‘या लोकोत्सवामाध्यमातून ज्या ज्या गोष्टी आपण शिकून त्याचा जीवनात समावेश करावा. पंचमहाभूतांशिवाय जगणे शक्य नसल्याने पंचमहाभूतांविषयी जागृती करण्याचा निर्धार या निमित्ताने आपण करूया.’’ या प्रसंगी अनेक मठ, मंदिर यांचे प्रमुख, संत, ह.भ.प. यांनी मनोगत व्यक्त केले.
क्षणचित्रे
या संमेलनात साधू-संत यांची गोलाकार आकारात बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती आणि प्रत्येकाला त्यांचा मठ-आश्रम या संदर्भात काय कृती आहे आणि भविष्यात काय कृती करेल, याविषयी म्हणणे मांडण्यास सांगितले होते.
या प्रसंगी प.पू. काडसिद्धेश्वर स्वामिजी यांचा कर्नाटक राज्याचे राज्यपाल थापरचंद्र गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची मूर्ती, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
राज्यातील अनेक भागातून आलेल्या संत सत्संगांमुळे एकत्र कुटंब भावना निर्माण झाली होती.
या संमेलनासाठी वारकरी संप्रदाय, तसेच महिला संत यांची उपस्थितीही लक्षणीय होती.