डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी ११ वा दीक्षांत समारंभ
डॉ. दिनकर साळुंके मुख्य अतिथी शाहिदा परवीन, वसंत भोसले यांना डॉक्टरेट
कोल्हापूर/प्रतिनिधी : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२3 रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनरिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार, लोकमतचे संपादक वसंत भोसले आणि जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना डी.लीट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. हॉटेल सयाजी येथील व्हिक्टोरीया सभागृहात सकाळी ११.०० वाजता दीक्षांत समारंभ होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, परीक्षा नियंत्रक डॉ. अभय जोशी, वित्त अधिकारी श्रीधर स्वामी, मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, उपकुलसचिव संजय जाधव आदी उपस्थित होते.
डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाची स्थापना २००५ साली झाली. विद्यापीठाने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून सलग दुसऱ्यांदा नॅकचे “अ’ मानांकन प्राप्त केले आहे. २०१८ साली मानव संसाधन विकास मंत्रालच्या सर्वेक्षणामध्ये विद्यापीठाला ९७ वा क्रमांक प्राप्त झाला होता. उत्कृष्ट तांत्रिकता पुरस्कारानेही विद्यापीठाला गौरवण्यात आले आहे. इंडिया टुडे व नेल्सनच्या सर्वेक्षणानुसार डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज हे पश्चिम विभागात तिसरे व राष्ट्रीय स्तरावर १५ वे उत्कृष्ट कॉलेज ठरले आहे. महाराष्ट्र इकॉनॉमिक समिट, मुंबई या संस्थेमार्फत ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कार व ‘बेस्ट इन्स्टिटयूट’ म्हणून डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयास गौरविण्यात आले. विद्यापीठाने समाजासाठी व शैक्षणिक फेलोशिपसाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल अॅकेडमिक साइट्सकडून “युनिव्हर्सिटी ऑफ द इअर २०२२ फॉर ट्रान्सफॉर्मेशनल लर्निंग” म्हणून नुकताच गौरव करण्यात आला आहे.
विद्यापीठाकडून पी.एच.डी. प्राप्त केलेले बहुसंख्य विद्यार्थी देश-विदेशात संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. वैद्यकीय व परिचारीका महाविद्यालयाच्या माध्यमातून कोल्हापूर परीक्षेत्रातील गरीब व गरजू रूग्णांना मोफत सेवा दिली जात आहे. भौतिकोपचार व औषध निर्माण शास्त्र शाखेच्या माध्यमातून आरोग्यसेवेत योगदान देणारे विद्यार्थी घडवले जात आहेत. आंतरशाखीय वैद्यकीय विषयात पदव्युत्तर व संशोधन अभ्यासक्रम व अल्पकालीन पॅरामेडिकल अभ्यासक्रमही सुरू असल्याचे डॉ. मुदगल यांनी यावेळी सांगितले. दीक्षांत समारंभाच्या नियोजनासाठी विद्यापीठ स्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून समन्वयकांमार्फत समितीचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. दिनकर एम. साळुंके यानी कर्नाटक विद्यापीठातून पदार्थविज्ञान, गणित आणि संख्याशास्त्र विषयात बी.एस्सी, पदार्थविज्ञानमध्ये एमएस्सी पदवी घेतली असून इंडियन इंस्टीट्युट ऑफ सायन्स मधून पीएच.डी केली आहे. १९९५ मध्ये नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्समध्ये फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली त्यानंतर देश विदेशातील विविध वैज्ञानिक संस्थावर महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले आहे. सीएसआईआरचे चेअरमन, डीपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीचे विश्वस्त, डीआरडीओच्या लाईफ सायन्स रिसर्च बोर्डचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
वसंत भोसले यांना सन्मान
दीक्षांत समारंभात डी. लिट. पदवीने सन्मानीत केले जाणारे वसंत भोसले हे राज्यातील ज्येष्ठ पत्रकार असून लोकमत या आघाडीच्या मराठी दैनिकाचे संपादक म्हणून कार्यरत आहेत. कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील भोजमध्ये जन्म झाला असला तरी महाराष्ट्र व मराठी भाषा यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार, स्त्री मुक्ती चळवळ यामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला असून तंबाखू उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनातही ते सहभागी होते. त्यानंतर ते पत्रकारितेकडे वळले. केसरी, पुढारी, सकाळ व त्यानंतर लोकमत या दैनिकांमध्ये बातमीदार, उपसंपादक, आवृत्तीप्रमुख ते संपादक अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहे. ‘पीपल्स पॉलीटिक्स’ या नियतकालिकाचे संपादकपदही त्यानी भूषवले आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात वृत्तांकन केले आहे. ‘जागर’ हे त्यांचे साप्ताहिक सदर लोकप्रिय आहे. ‘सह्याद्रीचा वारसा’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले असून ‘यशवंतराव चव्हाण- नव महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत.वारांगनासाठी काम करण्याऱ्या ‘संग्राम’ या एनजीओच्या सचिव असलेल्या मीना शेषु यांच्याशी वसंत भोसले यांचा विवाह झाला. या आदर्श जोडप्याने सामाजिक कार्याला वाहून घेताना तीन अनाथ मुलांना दत्तक घेण्याचा धाडसी निर्णय घेतला. समाजाप्रती असलेले दायित्व आणि आपल्या तत्त्वाप्रती असलेली निष्ठा याची प्रचीती यातून दिसून येते. त्यांनी दत्तक घेतल्या दोन मुली व एक मुलगा आज देशातील मोठ्या शिक्षण संस्थामध्ये शिक्षण घेत आहेत.
शहीदा गांगुली यांचा गौरव
जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना सन्मानानीय डी.लीट पदवीने गौरविण्यात येणार आहे. भारत – पाक सीमेवरील मंडी येथे एका मुस्लीम कुटुंबात शाहीदा यांचा जन्म झाला. केवळ ४ वर्षाच्या असताना त्यांचे पितृछत्र हरपले. या काळात अनेकदा दहशतवादी हल्ल्याच्या झळा त्यांना सोसाव्या लागल्या. यातूनच त्यांनी पोलीस सेवेत जाण्याचा निर्णय घेतला आणि १९९५ मध्ये त्या जम्मू- काश्मिर पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे नेतृत्व करताना दहशतवाद्याविरोधात त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. तब्बल ९० दहशतवाद्यांचा त्यांनी खातमा केला आहे. शहीद जवानांचे कुटुंबीय, अनाथ आणि विधवा यांच्यासाठी त्या काम करतात. महिलांवरील अत्याचाराविरोधातील त्या आवाज बनल्या असून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात.ब्रिगेडियर जी. गांगुली यांच्याशी त्यांचा विवाह झाला. उत्कृष्ट तपास अधिकारी, उत्तम गिर्यारोहक, नियमित मॅरेथान रनर, योग प्रशिक्षक आणि मोटीव्हेशनल स्पीकर अशी त्यांची विविधांगी ओळख आहे. शाहिदा परविन चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात महिला सबलीकरणासाठी त्या काम करतात. त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री’, ‘डीजीपी कॉमेंडेशन कार्ड’,’फिल्म टुडेकडून अचिव्हर्स अवार्ड’, ‘ग्लोबल वुमेन लीडर’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
५२० विद्यार्थ्यांना मिळणार पदवी
अकराव्या दीक्षांत समारंभात एकूण ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ८ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. डॉ नवनाथ शंकर पडळकर या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठ एक्सलन्स इन रिसर्च अवार्ड जाहीर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वागत केले. यावेळी परीक्षा नियंत्रक अभय जोशी यांनी दिल्या जाणाऱ्या पदव्यांची माहिती दिली.