Tuesday, October 8, 2024
Home ताज्या आदरणीय बाबा -  श्री.शाहू छत्रपती "महाराज"

आदरणीय बाबा –  श्री.शाहू छत्रपती “महाराज”

आदरणीय बाबा – श्री.शाहू छत्रपती “महाराज”

श्री शाहु छत्रपती महाराजांचा आज ७५ वा वाढदिवस संपन्न होत आहे. मला आदर्शवत आणि खऱ्या अर्थाने माझे मार्गदर्शक असलेल्या बाबांच्या विषयी माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करत आहे. छत्रपती घराण्याची थोर परंपरा जपण्यासाठी अहोरात्र दक्ष असणारे महाराज, बाबा म्हणून ही तितकेच संवेदनशील आहेत. लहानपणापासून त्यांनी आम्हाला आमच्या जबाबदारीची जाणीव करुन दिली. राजघराण्यात जन्माला आल्यामुळे जो मानसन्मान किंवा विशेष वागणूक समाजात मिळते त्याच्या पासून त्यांनी कटाक्षाने लांब ठेवले. लोकांच्या मध्ये मिसळल्याशिवाय त्यांची सुख-दुःखे समजणार नाहीत हा त्यांचा उद्देश असायचा.
आमच्यावर उत्तम संस्कार व्हावेत याची काळजी बाबांनी कायम घेतली, शालेय शिक्षणासाठी मला राजकुमार कॉलेज राजकोट येथे पाठवण्यात आले होते. याच कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहु महाराजांनी शिक्षण घेतले होते. कोल्हापूरला सुट्टीला आल्यानंतर, सुट्टी संपल्यावर बाबा मला सोडायला दरवेळी राजकोटला यायचे. शाळा जसजशी जवळ यायची तसतसे माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असत आणि महाराजांच्या चेहऱ्यावरची काळजी व त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट जाणवायची. शाळेत सोडताना बाबा मला मिठी मारायचे, डोळ्यातून अश्रू यायचे. राज्यसभेवर खासदार म्हणून माझी निवड झाली आणि नवीन राजवाड्याच्या पोर्चमध्ये पहिल्यांदा बाबांची भेट झाली तेव्हा मारलेली मिठी, डोळ्यातून आलेले अश्रू यातील प्रेम, जिव्हाळा, काळजी तितकीच होती, जितकी राजकुमार कॉलेज राजकोट या शाळेत सोडताना मारलेल्या मिठीत होती.
बाबांनी नेहमीच व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर केला. माझ्या लग्नाच्यावेळी वधू निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. लग्न झाले त्यावेळेची आठवण सांगताना संयोगीताराजे सांगतात, “लग्न झाले तेव्हा मी खूपच लहान होते, पण बाबांनी मला खूप समजावून घेतले. मी आपणास बाबा म्हणू का? असे विचारले असता, माझी दोन्ही मुलं बाबा म्हणतात, तुम्हीपण मला बाबाच म्हणा असे बाबांनी सांगितले. किती प्रेम, किती आपुलकी, बाबांनी खुप लाड केले. बाबांनी मला नेहमीच मुलीसारखे वागवले”. तारा कमांडो फोर्स च्या बियासकुंड ट्रेकला बाबांच्या बरोबर संयोगीताराजे गेल्या असता, तिथला एक प्रसंग इथे सांगण्यासारखा आहे. रात्रीच्या वेळी कँपवर असताना, अचानकपणे वादळ व जोराचा पाऊस सुरु झाला. अनेकांच्या टेंटमध्ये पाणी येवू लागले. बाबांना काळजी वाटू लागली. संयोगीताराजेंना शोधत बाबा स्वतः पावसात कंदील घेऊन आले. सर्व सुखरूप असल्याची खात्री करुन पुन्हा आपल्या टेंटमध्ये गेले. कोणत्याही कामाचे सुक्ष्म नियोजन कसे करायचे, हे बाबांच्या कडूनच शिकण्यासारखे आहे, असे संयोगीताराजे कायम म्हणत असतात.
शहाजी लहान असताना, बाबा व शहाजी अनेकवेळा कुशीरे ते जोतिबा ट्रेकला जात असत. घोडेस्वारी, व्यायाम, पोहणे यासाठी बाबा कायम शहाजींना प्रोत्साहन देत. शहाजी बाबांच्या विषयी बोलताना म्हणतात, “आबांशी चर्चा करताना, प्रत्येक विषयाचा पुर्ण अभ्यास करून जावे लागते. कोणत्याही गोष्टीचा खोलवर अभ्यास करुन ते निर्णय घेत असतात. आबांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांचा व्यासंग मोठा आहे. तरीही आबांचा विवेक (Intellect) कायम जागृत असतो. आबांचा हा गुण मला कायम प्रेरणा देणारा आहे”.
इतिहास हा बाबांचा आवडता विषय आहे, छत्रपती शहाजी महाराजांच्या प्रमाणेच त्यांनी इतिहास संशोधन मंडळास प्रोत्साहन देऊन मराठा इतिहास लेखन चळवळ पुढे चालू ठेवली. यातून अनेक ग्रंथांची निर्मिती झाली आहे.
राजर्षी शाहु महाराजांनी शैक्षणिक कार्यात केलेल्या कार्याचा वसा घेऊन सामान्य माणसाला गुणवत्तापुर्ण उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी बाबांनी छत्रपती शाहु विद्यालयाची स्थापना केली. इंग्रजी शाळेमध्ये मराठी भाषेची सक्ती बाबांनी केली. कारण मातृभाषा अवगत असल्या शिवाय मातृभूमीशी नाळ जोडली जात नाही असा त्यांचा ठाम विश्वास आहे. साहसी वृत्ती समाजामध्ये रुजावी या उद्देशाने करवीर संस्थापिका महाराणी ताराबाईराणी साहेब यांच्या नावाने तारा कमांडो फोर्स (TCF) ची स्थापना केली आहे.
बाबा क्रीडाप्रेमी आहेत. कुस्ती आणि फुटबॉल हे त्यांचे आवडते खेळ आहेत. आणि हेच संस्कार माझ्या व शहाजी मध्ये आलेले आहेत. नवीन राजवाड्याच्या लाल आखाड्यातील माती अंगाला लागली. कुस्ती बरोबरच फुटबॉल, क्रिकेट, घोडेस्वारी, स्विमिंग याची आवड बाबांमुळेच निर्माण झाली. बाबा स्वत: शाळेवरील टाकीत मला पोहायला शिकवायचे. यातूनच माझ्यात खिलाडूवृत्ती आणि धाडसीपणा निर्माण झाला.
बाबा त्यांचे वडील मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांच्या प्रमाणेच कडक शिस्तीचे आहेत. माझ्यात जी काही शिस्त आहे ती बाबांमुळेच. आणि शांत स्वभाव आईंच्या मुळे आहे.
बाबांच्या अनेक छंदापैकी एक छंद म्हणजे, प्रवास व पर्यटन. प्रवास व पर्यटनामुळे माणसाच्या ज्ञानाची क्षितिजे विस्तारतात. जगाचा परिचय होतो. वेगवेगळ्या संस्कृती ची ओळख होते. माणूस परिपुर्ण प्रवासामुळे होतो असा बाबांचा पक्का विश्वास आहे. बाबांच्या प्रेरणेमुळेच मी संयोगीताराजे व शहाजी अनेक स्थळी पर्यटन करुन त्या ठिकाणचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक महत्त्व जाणून घेत असतो.
बाबा शेतीकडे वेगळ्याच नजरेने पाहत असतात. बाबांच्या मते शेतीमध्ये वेळेला फार महत्व असते. वेळेचे गणित ज्या शेतकऱ्याला समजते तोच खरा शेतकरी. शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग करणे आणि नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग शेती व सर्व क्षेत्रात करावा यासाठी त्यांचा कायम आग्रह असतो.
बाबांच्या जीवनात स्वच्छतेला व पर्यावरणाला महत्वाचे स्थान आहे. संयोगीताराजे व शहाजी यांना पर्यावरणाची आवड बाबांच्या मुळेच लागली.बाबांनी आम्हाला सर्व कामामध्ये परिपूर्ण बनवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच कोणत्याही प्रसंगाला धैर्याने तोंड देण्याची वृत्ती माझ्यात निर्माण झाली. आमच्या जडण घडणीमध्ये त्यांचे मोलाच मार्गदर्शन लाभत असते.
माझ्या मनात बाबांच्या विषयी कायमच आदराचे स्थान आहे. बाबांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो, मनःशांती आणि आनंद मिळो हीच प्रार्थना ! आम्ही आपल्या छत्रछायेखाली राहो आणि आपले मार्गदर्शन सतत राहो हीच सदिच्छा !
आमच्या तिघांच्या अंत:करणात बाबांचे स्थान अस्सिम आहे.
बाबा आणि माझे नाते एका शब्दात सांगायचे झाले तर….एकच शब्द येतो, तो म्हणजे ‘AWE’ (Respect with Reverential Fear) म्हणजे आदरयुक्त भिती.

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापुरात साकारत आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय नगरी शेंडा पार्कमध्ये १,१०० बेडच्या अद्ययावत हॉस्पिटलचे उद्या भूमिपूजनवै द्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; पालकमंत्री...

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

शेंडा पार्क हॉस्पिटल भूमिपूजनसह केडीसीसी बँकेच्या नूतन इमारतीचे लोकार्पण सेनापती कापशी येथील सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पुतळ्याचेही अनावरण कागल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा उत्तुर येथील...

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा

लोकसभा व राज्यसभेत जातीनिहाय जनगणना मंजूर करू विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांची घोषणा   कोल्हापूर/प्रतिनिधी : दलित मागास वंचित वर्गातील लोकांना उद्योग, व्यवसाय याठिकाणी कुठेही फारशी...

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा

शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या दिवशी दिवशी आई अंबाबाई श्री क्षेत्र सन्नती येथे चंद्रालांबा देवीच्या रूपात पूजा कोल्हापूर/प्रतिनिधी : आज अश्विन शुक्ल तृतीया. शारदीय नवरात्र महोत्सवाचा तिसरा...

Recent Comments