कंदलगाव येथील १४ वर्षीय शाळकरी मुलीचा विहिरीत सापडला मृतदेह,घातपात असल्याच्या संशयितावरून दोघेजण ताब्यात
कोल्हापूर/प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील कंदलगाव इथल्या विहिरीत रविवारपासून बेपत्ता असलेल्या कंदलगाव इथल्या एका १४ वर्षीय शाळकरी मुलीचा मृतदेह आज सकाळी आढळून आला. हा घातपात असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी कंदलगाव आणि मोरेवाडी इथल्या दोघा संशयित मुलांना ताब्यात घेतल्याशिवाय मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयत मुलीच्या नातेवाईकांनी घेतल्याने सीपीआर रूग्णालयाच्या आवारात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
करवीर तालुक्यातील कंदलगाव येथे १४ वर्षीय शाळकरी मुलगी तिचे आई-वडील आणि भावासह रहात होती. ती कंदलगाव – आर के नगर परिसरातील एका शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होती. रविवारी ती अचानक घराबाहेर गेली होती. तिचे वडील आणि नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ती आढळून आली नव्हती. त्यामुळे तिचे अपहरण होवून, ती बेपत्ता झाल्याची फिर्याद, तिच्या वडिलांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. दरम्यान, त्या मुलगीचा मृतदेह आज सकाळी कंदलगाव इथल्या विहिरीमध्ये आढळून आला. याबाबतची माहिती कळताच, तिचे कटुंबीय आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून, तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सी पी आर रुग्णालयाकड आणला.
दरम्यान, माझ्या मुलगीने आत्महत्या केली नसून, तिचा घातपात झाल्याचा संशय वडिलांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी तिच्या मोबाईलवर नेहमी चॅटिंग करणाऱ्या कंदलगाव आणि मोरेवाडी इथल्या दोघां युवकांवर संशय व्यक्त करत, त्या दोघांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा तिच्या नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे सीपीआर रुग्णालयाच्या परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी करवीरचे पोलीस उप अधीक्षक संकेत गोसावी आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी याप्रकरणी संशयितांवर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी तपास सुरू असून, लवकरच योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांनी सांगितले आहे.