यंदा १९ ऑगस्टला युवाशक्ती दहीहंडीचा थरार रंगणार,प्रथम क्रमांकासाठी ३ लाख रूपयांचे बक्षीस
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य आणि लोकप्रिय युवाशक्ती दहीहंडीची तयारी पूर्ण
कोल्हापूर/प्रतिनिधी : महापूर आणि कोरोना संसर्गामुळे गेली ३ वर्षे युवाशक्ती दहीहंडीचे आयोजन झाले नव्हते. आता मात्र कोव्हीड संसर्ग ओसरला आहे. दुसरीकडे राज्य शासनाने सर्व सण आणि उत्सवावरील निर्बंध हटवले आहेत. त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजपच्यावतीने दहीहंडीचा थरार आणि जल्लोष रंगणार आहे. यंदा शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा होणार आहे. कोल्हापुरातील दसरा चौक मैदान येथे तब्बल ३ लाख रूपयांची दहीहंडी फोडण्यासाठी, गोविंदा पथकांची चुरस रंगणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाला उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, सुरेश हाळवणकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मान्यवरांच्या हस्ते दहीहंडी स्पर्धेमधील विजेत्या गोविंदा संघाला रोख ३ लाख रूपयांचे पारितोषिक दिले जाईल. शिवाय युवाशक्ती दहीहंडी स्पर्धेत सहभागी होणार्या प्रत्येक गोविंदा पथकाला, प्रोत्साहन देण्यासाठी अन्य बक्षिसांचा वर्षाव केला जाईल. पहिल्याच प्रयत्नात पाच थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला ५ हजार रूपये आणि सहा थर रचून सलामी देणार्या गोविंदा पथकाला १० हजार रूपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच सर्वात वरच्या थरावर चढून दहीहंडी फोडणार्या गोविंदाच्या सुरक्षेेसाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे. त्यासाठी समीट ऍडव्हेंचरचे विनोद काम्बोज आणि हिल रायडर्सचे प्रमोद पाटील यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तसेच सीपीआर आणि सिद्धगिरी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकांसह डॉक्टरांचे पथक सज्ज राहणार आहे. दहीहंडी फोडणारा गोविंदा १४ वर्षावरील असावा, या नियमाचे काटेकोर पालन केले जाईल. शिवाय महिला गोविंदा पथकांना २५ हजार रुपयांचे विशेष प्रोत्साहनपर पारितोषिक दिले जाणार आहे. श्रीमंत प्रतिष्ठानचे ढोलताशा पथक आणि सार्थक क्रिएशनच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी दहीहंडी स्पर्धेची रंगत वाढणार आहे. शासनानं दहीहंडी खेळाला साहसी खेळ प्रकाराचा दर्जा दिला आहे. त्यानुसार सर्व नियमांचं पालन करून स्पर्धेचं आयोजन होणार आहे.
दरवर्षीप्रमाणे ऐतिहासिक अशा दसरा चौक मैदानावर दहीहंडीसाठी शिस्तबध्द नियोजन केले आहे. उत्तम ध्वनी आणि प्रकाश व्यवस्था, निमंत्रित मान्यवरांसाठी भव्य व्यासपीठ, महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असणार आहे. शिवाय संपूर्ण दहीहंडी सोहळ्याचे चॅनल बी वरून थेट प्रक्षेपण होणार आहे. युवाशक्ती दहीहंडीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींना निमंत्रित केले आहे. स्पर्धेत सहभागी होणार्या सर्व संघांना युवाशक्तीचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते कपड्यांचे कीट दिले जाणार आहे. या स्पर्धेला बालाजी कलेक्शन, काले बजाज, समृध्दी सोलर आणि साजणीचे अमित ट्रेडर्स हे प्रायोजक आहेत, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. दहीहंडी स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी कोल्हापूर वासियांनी १९ ऑगस्टला ४ वाजता दसरा चौकात उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले आहे. पत्रकार परिषदेसाठी विनोद कांंबोज, प्रमोद पाटील, विजय टिपुगडे, उत्तम पाटील, अनंत यादव, राजेंद्र बनसोडे, सागर बगाडे, प्रशांत काकडे, नितीन भोसले उपस्थित होते.