मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या शपथविधी नंतर कोल्हापुरात शिवसैनिकांचा आनंदोत्सव
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेले दहा दिवस सुरु असलेल्या राजकीय घडामोडी नंतर शिवसेनेचे नेते नाम.श्री.एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ आज घेतली. या शपथविधी नंतर कोल्हापुरातील शिवसैनिकांनी साखर – पेठे वाटप आणि फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष साजरा केला. आज सायंकाळी नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे यांचा शपथविधी पाहण्यासाठी शिवालय शिवसेना शहर कार्यालय येथे शेकडो शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शपथविधी पार पडल्यानंतर शिवसैनिकांनी भगवे ध्वज आणि शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री नाम.श्री.एकनाथ शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे फलक फडकवीत हलगीच्या ठेक्यावर आनंदोत्सव साजरा केला. यानंतर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिकांनी पदयात्रा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी साखर – पेठे वाटून शिवसैनिकांनी आनंद द्विगुणित केला.
यावेळी देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्षा सौ.वैशाली राजेश क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख जयवंत हारूगले, माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, युवानेते पुष्कराज क्षीरसागर, महिला आघाडी शहरप्रमुख मंगलताई साळोखे, माजी शहरप्रमुख पूजा भोर, पूजा कामते, मंगल कुलकर्णी, शाहीन काझी, गौरी माळतकर, ज्योती हंकारे, रणजीत जाधव, तुकाराम साळोखे, किशोर घाटगे, अश्विन शेळके, रियाज बागवान, निलेश हंकारे, मंदार तपकिरे, अंकुश निपाणीकर, युवासेना शहरप्रमुख विश्वदीप साळोखे, पियुष चव्हाण, योगेश चौगले, शैलेश साळोखे आदी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.