कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर सराफ व्यापारी संघ आणि जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने दैवज्ञ बोर्डिंग येथे आज झालेल्या मेळाव्याला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रदर्शनासाठी मोठ्या संख्येने नोंदणी झाल्याचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ यांनी सांगितले. मुंबई (गिरगाव) येथे ४ ते ८ ऑगस्ट २०२२ रोजी ज्वेलरी, मौल्यवान रत्ने, दागिने, मशिनरी यांचे भव्य प्रदर्शन जीजेईपीसीच्या वतीने आयआयजेएस भरविणार आहे त्यात कोल्हापुरातून होलसेलर भाग घेतात. देशभरातून मोठ्या संख्येने सराफ व सुवर्णकार व्यावसायिक त्याला भेट देतात. त्याच्या नोंदणीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, जीजेईपीसीचे संचालक शामल पोटे, सहायक संचालक नाहीद सनके, व्यवस्थापक अनु कोडगुले, माजी नगरसेवक ईश्वर परमार, अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी सचिव प्रीतम ओसवाल आणि तेजस धडाम यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रम रूपरेषा नितीन ओसवाल यांनी स्पष्ट केली. जीजेईपीसीच्या प्रतिनिधीनी स्लाईड शोच्या माध्यमातून प्रदर्शनाची माहिती दिली. अध्यक्ष राजेश राठोड यांनी सर्व सभासदांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या नूतन पदाधिकारी आणि संचालक मंडळाचा सत्कार सराफ संघाच्या वतीने करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे संचालक कुलदीप गायकवाड, किरण गांधी, ललित ओसवाल, कुमार ओसवाल, अशोककुमार ओसवाल, विजयकुमार भोसले, संजय रांगोळे, भैरू ओसवाल, सिद्धार्थ परमार, शीतल पोतदार, शिवाजी पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.