जयप्रभा स्टुडीओच्या जागेच्या प्रश्नी नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक – श्री.राजेश क्षीरसागर
कोल्हापूर /प्रतिनिधी : कोल्हापूर शहराची अस्मिता असणारा आणि चित्रपटसृष्टीच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार अशा जयप्रभा स्टुडीओच्या जागेबद्दल गेली अनेक दिवस अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने उपोषण सुरु आहे. जयप्रभा स्टुडीओची जागा कोल्हापूरची अस्मिता असून, कोल्हापूरवासीय आणि कलाकारांच्या भावनांचा अनादर होणार नाही. गेल्या काही दिवसात ही जागा शासन ताब्यात घेवून, विकासकाला पर्यायी जागा देण्याबाबत शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहे. या प्रश्नी आंदोलन कर्त्या कलाकार बांधवांची भेट घेऊन नगरविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर यांनी दिले होते.
त्यानुसार उद्या दिनांक २८ मे २०२२ रोजी दुपारी २ वाजता नगर विकास मंत्री नामदार माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार आहे. या बैठकीमध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर, विकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, जिल्हाधिकारी कोल्हापूर आणि आयुक्त कोल्हापूर महानगरपालिका उपस्थित असणार आहेत.
याबाबत बोलताना श्री.राजेश क्षीरसागर यांनी , कलाकार आणि मराठी चित्रपट सृष्टीच्या उन्नतीसाठी शिवसेना नेहमीच प्रयत्नशील आहे. जयप्रभा स्टुडीओच्या जागेसाठी २०१२ मध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी होतो. लोकभावनांचा आदर ठेवून खरेदीदार कंपनीस पर्यायी जागा स्विकारून स्टुडीओची जागा शासन ताब्यात देण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोल्हापूर महापालिका प्रशासनासही पर्यायी जागा देवून स्टुडीओची जागा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आपण केलेल्या मागणीप्रमाणे नगरविकास मंत्री नाम.मा.श्री.एकनाथजी शिंदे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत जयप्रभा स्टुडिओच्या जागेचा प्रकरणी तोडगा निघण्याची शक्यता आहे. होणाऱ्या बैठकीत शासनाकडून सकारात्मक निर्णय मिळवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे श्री.क्षीरसागर यांनी सांगितले.