जयश्री जाधव यांनी मॉर्निंग वॉकर्स नागरिकांशी साधला संवाद
कोल्हापूर/प्रतिनिधी : हुतात्मा गार्डन, सिध्दाळा गार्डन मध्ये मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी संवाद साधला. शहर सुशोभिकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. जाधव यांनी सांगितले की, शहरातील प्रत्येक गार्डन सुसज्ज असावे यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आण्णा सातत्याने प्रयत्नशील होते. हुतात्मा पार्क व महावीर गार्डनच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार करुन घेतला होता. एक ही झाड न तोडता हे सुशोभीकरण होणार आहे. मुंबईनंतर पहिला स्काय वॉक हुतात्मा पार्कमध्ये उभारण्यात येणार आहे. पार्कमधील मध्यवर्ती स्मारकाचे पूनरज्जीवन करून, स्मारक भिंतीवर बलिदान दिलेल्या हुतात्म्याची नावे कोरण्यात येणार आहेत. तसेच कोल्हापूरच्या सांस्कृतिक परंपरेला साजेशा ओपन थिएटरची निर्मिती करण्यात येणार आहे. शहर सुशोभिकरणाचे आण्णांचे अपूर्ण काम पूर्ण करण्यासाठी संधी द्या, असे आवाहन जयश्री जाधव यांनी केले..यावेळी उपस्थित नागरिकांनी जयश्री वहिनी या आण्णांच्या सामाजिक कार्याचा व विकासाचा वारसा समर्थपणे पुढे नेतील असा विश्वास व्यक्त केला. जयश्री जाधव वहिनीच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू असा उत्स्फूर्त प्रतिसाद यावेळी नागरिकांनी दिला. यावेळी बाळासाहेब निचिते, इंद्रजीत नलवडे, श्रीमती र्मेदाने, पांडुरंग पाटील, जेष्ठ नागरिक नलवडे , विनायक देसाई आदी उपस्थित होते.