‘पांघरूण’च्या निमित्ताने रंगणार सांगितिक मैफल
कोल्हापूर/प्रतिनिधी : काकस्पर्श, नटसम्राट अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेला ‘पांघरूण’ हा चित्रपट उद्या (ता. ४) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच ‘पांघरूण’ या चित्रपटाचे ट्रेलर प्रदर्शित झाले असून या चित्रपटात एक विलक्षण प्रेमकहाणी आहे आणि मुख्य म्हणजे प्रेक्षकांसाठी एक सांगितिक मेजवानी आहे. ६० च्या दशकातील काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी विलक्षण प्रेमकहाणी आपल्याला ‘पांघरूण’ मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा एका सतरा-अठरा वर्षाच्या मुलीची असून वडिलांच्या वयाच्या माणसासोबत लग्न झाल्यावर तिचा जीवनप्रवास कशा प्रकारे होतो यावर आधारित हा चित्रपट आहे. “पांघरूण’ या चित्रपटात नऊ गाण्यांचा समावेश असून ही गाणी संगीतरसिकांच्या भेटीस आली आहेत. या गाण्यांचे बोल, संगीत रसिकांना भावले असून ते मनाला भिडणारे आहे. चित्रपटातील ‘ही अनोखी गाठ’ हे गाणे गायक विजय प्रकाश यांनी गायले असून हे एक भावनिक गाणे आहे. नववधूच्या मनातील घालमेल या गाण्यात दिसत आहे तर ‘धाव घाली आई’ या भक्तिमय गाण्याला आनंद भाटे यांचा आवाज लाभला असून ‘सतरंगी झाला रे’ हे सुमधुर गाणे पवनदीप राजन यांनी गायले आहे. ‘इलूसा हा देह’ या श्रवणीय गाण्याला आनंद भाटे यांनी आवाज दिला आहे. ‘साहवेना अनुराग’ या काळजाला भिडणाऱ्या गाण्याला गायिका केतकी माटेगावकर यांचा मधुर आवाज लाभला आहे. ‘इल्लूसा हा देह’ केतकी माटेगावकर व विजय प्रकाश यांनी गायले आहे ,देवे ठेविले तैसे राहावे’ या गाण्याला आनंद भाटे, ‘जीव होतो कासावीस’ या गाण्याला आनंद भाटे आवाज दिला आहे. या संगीत मैफलीचा आनंद आपल्याला ‘पांघरूण’मध्ये घेता येणार आहे. या सर्व गाण्यांना हितेश मोडक, सलील कुलकर्णी, पवनदीप राजन, अजित परब यांचे संगीत लाभले असून यात संत तुकाराम आणि संत सावळा माळी यांचे अभंग आहेत आणि दोन गाणी वैभव जोशींची आहेत. झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती ‘पांघरूण’च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.