राज्यात शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत महापालिकेच्या शाळेतील १० विद्यार्थ्यांची बाजी
कोल्हापूर/प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी स्तर) शिष्यवृत्ती परीक्षा सन २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षातील पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी स्तर) शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहिर करण्यात आला. यामध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत तसेच जिल्ह्याचे गुणवत्ता यादीमध्ये महानगरपालिका शाळांतील १० विद्यार्थ्यांनी बाजी मारुन टॉप १२ मध्ये आपले स्थान कायम राखले आहे. या विद्यार्थ्यांनी हे उज्वल यश संपादन करुन महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीचे नांव लौकिक वाढविला आहे. यामध्ये महानगरपालिका यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर मधील कुमारी देवयाणी हेमंत बेर्डे व जाधववाडी येथील प्रिन्स शिवाजी विद्यामंदिर मधील कुमार अधिराज धनंजय पाटील या दोन विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये सहावा क्रमांक मिळवून गरुड भरारी घेतली आहे.
महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या शाळांनी वर्षभरामध्ये विशेष असे उपक्रम राबविलेले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेकडे विद्यार्थी आकर्षित होवू लागले आहेत. शाळेकडून सराव चाचण्या, शिष्यवृत्ती विषयक ६ दिवसाचे मार्गदर्शन शिबीर, जादा तास, शाळा स्तरावर शिष्यवृत्तीच्या धर्तीवर मॉडेल पेपर विद्यार्थ्यांकडून सराव करुन घेण्यात आले. महापालिकेच्या शाळेच्यावतीने अशा विविध उपक्रमामूळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेत आपला दबदबा कायम राखला आहे. सन २०२० – २०२१ या शैक्षणिक वर्षात दि. १२ ऑगस्ट २०२१ मध्ये घेणेत आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी स्तर) शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशवंतराव चव्हाण विद्यामंदिरची विद्यार्थ्यीनी देवयाणी हेमंत बेर्डे व प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरचा विद्यार्थ्यी अधिराज धनंजय पाटील यांनी ९४% गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक मिळविला आहे. श्रीमती लक्ष्मीबाई कृ.जरग विद्यामंदिरचा विद्यार्थी सक्षम शिवाजी सोनाळकर याने ९३.% गुण मिळवून राज्यात सातवा क्रमांक मिळविला आहे. प्रिन्स शिवाजी विद्यामंदिरची प्रगती मारुती आंबडे हिने ९२.% गुण मिळवून राज्यात आठवा क्रमांक मिळविला आहे. प्रि. शिवाजी विद्यामंदिरचा प्रध्दुमन नितीनकुमार कमते याने ९१ % गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक मिळविला आहे. नेहरुनगर वसाहत विद्यामंदिरचा विद्यार्थी पार्थ रामदास वास्कर व अजिक्य नितीन खुडे यांनी ९१ % गुण मिळवून राज्यात दहावा क्रमांक मिळविला आहे. प्रि. शिवाजी विद्यामंदिरचा श्रेयश श्रीराम बजबले, टेंबलाईवाडी विद्यामंदिरचा सुमित सिध्दाप्पा लोखंडे व जोतिर्लिंग विद्यामंदिरचा हर्षवर्धन अर्जून जानकर यांनी ९०% गुण मिळवून राज्यात बारावा क्रमांक मिळविला आहे.हे यश संपादन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. राज्यात शिष्यवृत्तीमध्ये टॉप १० मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचे व प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार व प्राथमिक शिक्षण समितीकडील अधिकारी व कर्मचारी यांचे महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे