ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध लागू -जिल्हाधिकारी राहुल रेखावार
कोल्हापूर, दि. ३१ (जिमाका): ओमायक्रॉन विषाणुचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने साथरोग अधिनियम १८९७ मधील कलम २ आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील अधिकारास अनुसरून जिल्ह्यात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजीच्या रात्री १२.०० वाजल्यापासून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत.
लागू करण्यात आलेले निर्बंध खालीलप्रमाणे – लग्न / विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
इतर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अथवा धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास परवानगी असेल.
अंत्यविधी / अंत्ययात्रा बाबतीत उपस्थित व्यक्तींची संख्या २० पर्यंत मर्यादित असेल. या आदेशात नमूद केलेल्या निर्बंधांव्यतिरिक्त दि. २९ नोव्हेंबर व २५ डिसेंबर २०२१ रोजीच्या आदेशातील सर्व निर्बंध लागू राहतील.या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल.