१० वी परीक्षेला तणाव मुक्त सामोरे जाण्यासाठी भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन
कोल्हापूर /प्रतिनिधी : भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. यामध्ये बुद्धिबळ, लहान मुलांना प्रेरणादायी चित्रपट, गणिताचे वर्ग, तबला, डान्स, फिरते वाचनालय, स्पेस ईनोव्हेशन लॅब अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या मुलांसाठी “तणावमुक्त परीक्षेस सामोरे कसे जावे” या विषयावर सविस्तर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षा तणाव मुक्त होणेसाठी काही सहज सोपे उपाय, अभ्यासाचे वेळापत्रक, अभ्यासाचे तंत्र, पेपर कसे सोडवावेत, उजळणी कशी करावी व पालकांनी मुलांना सतत ताण न देता घरातील वातावरण कसे तणावमुक्त राहील या दृष्टीने तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले आहे. सदर व्याख्यान भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, बाबा जरग नगर कमानी समोर, पाचगाव रोड, कोल्हापूर येथे दिनांक ११ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ठीक ७.४५ वाजता असून दहावीच्या विद्यार्थी व पालकांनी (आई व वडील) दोघांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन भालचंद्र चिकोडे ग्रंथालयाचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी केले आहे.