एस. टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या महाविकास आघाडीने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात – भारतीय जनता पार्टीचा एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा
कोल्हापूर/प्रतिनिधी : गेल्या २० दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित असल्यामुळे हा संप चालू आहे. यावर सरकारने कोणताही निर्णय न घेतल्यामुळे प्रवाशांचे व एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. सदर अनुषंगाने कोल्हापूर येथील मध्यवर्ती बस स्थानक येथे सुरू असलेल्या संपामध्ये सहभागी होऊन भारतीय जनता पार्टी तर्फे पाठिंबा देण्यात आला.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे बोलताना म्हणाले की, हे सत्तेत असलेले तिघाडी सरकार सर्व सामन्यांच्या जीवाशी खेळत आहे. या सरकारला सर्व सामन्यांचे काही पडलेले नाही हे फक्त घोटाळे कसे करायचे, पैसे कसे खायचे यामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांचे हाल होताना दिसून येत आहेत. हे अपयशी सरकार एस.टी कर्मचाऱ्यांच्या असलेल्या मागण्यांवर लक्ष न देता नको तिकडे जास्त लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एस.टी कर्मचाऱ्यांच्या सोबत असेल. सरकार एस.टी कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या जोपर्यंत पूर्ण करत नाही तो पर्यंत भारतीय जनता पार्टी एस. टी कर्मचाऱ्यांच्या मागे ठाम उभा राहील.
यावेळी बोलताना प्र.का सदस्य महेश जाधव म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमुळे जनतेला कोणताही फायदा झालेला नाही, उलट तोटाच झालेला आहे. एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या या रास्त आहेत. त्यांच्या मागण्यांचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टी भक्कम विरोधी पक्ष म्हणून कर्मचाऱ्यांच्या ज्ञाय मागण्यासाठी सातत्याने पाठीशी उभी राहील. एस.टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ह्या त्यांच्या हक्काच्या मागण्या असून त्यांनाच त्यांच्या मागण्यांसाठी रस्त्यावरती यावे लागत आहे. यावर सरकारने लवकरात लवकर काय निर्णय आहे तो जाहीर करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही असे सांगितले.यावेळी भाजपा संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष विजय आगरवाल उपस्थित होते.