गोकुळकडून दूध संस्थांच्या खात्यावर ८३.८१ कोटी रुपये इतकी रक्कम दिवाळीपूर्वी जमा होणार – चेअरमन श्री.विश्वास पाटील
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) कडून प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही म्हैस व गाय दूध दरफरकापोटी ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर १४ ऑक्टोबर २०२१ इ. रोजी जमा करणार असल्याची माहीती गोकुळचे चेअरमन मा.श्री. विश्वास नारायण पाटील यांनी दिली.संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस दूध दरफरक दिला जातो. त्याप्रमाणे यावर्षी संघाने म्हैस दुधाकरीता ४९ कोटी ५३ लाख २ हजार रुपये तर गाय दुधाकरीता २१ कोटी ५० लाख १८ हजार रुपये इतका दूध दरफरक व त्यावरील ६ % प्रमाणे होणारे व्याज २ कोटी ८६ लाख ७४ हजार रुपये व डिबेंचर्स व्याज ६.५०% प्रमाणे ४ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपये व शेअर्स भांडवलवर ११ % प्रमाणे डिव्हीडंड ५ कोटी ३३ लाख ६५ हजार रुपये असे एकूण ८३ कोटी ८१ लाख ५० हजार रुपये इतकी रक्कम दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे.
मागील वर्षाच्या महापूरामुळे शेतकरी अडचणीत आलेला होता. तसेच सगळीकडे कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे सर्व उद्योगधंदे व शेतीपूरक व्यवसाय अडचणीत असताना गोकुळ दूध संघाने खर्चात काटकसर करुन वर्षभर राज्यातील इतर संघांच्या तुलनेत जास्त दूध दर दिलेला आहे.गोकुळने दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना व विकास प्रकल्प राबविलेले आहेत.दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे सांगून चेअरमन विश्वास पाटील यांनी आमचे नेते राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री मा.नाम. हसन मुश्रीफसो, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे गृह राज्यमंत्री मा. नाम. सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांचे मार्गदर्शन व सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादक यांच्या सहकार्यामुळे आम्ही गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू ठेवू शकलो आहोत. याहीपुढे ती आम्ही चालू ठेवू याकरिता दूध संस्था व उत्पादकांचे सहकार्य मोलाचे असल्याचे त्यांनी नमुद केले व दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांना दसऱ्याच्या व दीपावलीच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्छा दिल्या.