सर्वसामान्य ग्राहकांसाठी बँकांच्या वतीने जनसंपर्क अभियान – जिल्हा अग्रणी प्रबंधक महेश हरणे
सांगली/दि.११(जि. मा. का.) : केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दि. ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ दरम्यान सर्व बँकांच्या वतीने संयुक्त जनसंपर्क अभियान राबवायचे आहे. सांगली जिल्ह्यात बुधवार, दि. १३ ऑक्टोबर २०२१ रोजी इस्लामपूर येथे तर गुरुवार, दि. १४ ऑक्टोबर २०२१ रोजी सांगली येथे संयुक्त जनसंपर्क मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधक महेश हरणे यांनी दिली.
सांगली येथील मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याहस्ते सकाळी १०.३० वाजता वाडीकर मंगल कार्यालय, नेमिनाथ मैदानाशेजारी, विश्रामबाग येथे होईल. तसेच इस्लामपूर येथील मेळाव्याचे उद्घाटन गट विकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांच्याहस्ते सकाळी १०.३० वाजता विजया सांस्कृतिक हॉल, ताकारी रोड, इस्लामपूर येथे होईल. दोन्ही कार्यक्रमात शेती विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, नाबार्डचे अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. कार्यक्रमादरम्यान पीक व शेती कर्ज, मुद्रा योजना, उद्योगांसाठी सरकारी योजना जसे कि PMEGP / CMEGP, STAND UP योजना, AIF, अन्न प्रक्रिया उद्योगांसाठी योजना, विमा योजना यांची माहिती दिली जाईल.
सर्व बँकांचे प्रतिनिधी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणी हजर राहून माहिती देतील. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी प्रबंधक महेश हरणे यांनी सर्व बँकांच्या वतीने केले आहे.