कोरोनामुळे कोल्हापूरातील सामान्य जनतेसाठी पुन्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्क राहावे
कोल्हापूर/प्रतिनिधी : गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर २०२१ पासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे.कोल्हापूरची श्री अंबाबाई (महालक्ष्मी) साडेतीन शक्ती पीठांपैकी एक पीठ आहे.त्यामुळे कोल्हापुरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून श्री अंबाबाईच्या (महालक्ष्मी) दर्शनासाठी लाखो लोक गर्दी करत असतात. भक्तांची गर्दी झाल्यास कोल्हापूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. यासाठी प्रशासनाने काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हक्कदार श्री पूजकांचे व ज्या भक्तांचे लसीचे दोन डोस पूर्ण झालेले आहेत त्यांनाच श्री अंबाबाई (महालक्ष्मी) च्या दर्शनासाठी प्रवेश द्यावा.
( जसे शाळा सुरु करताना शिक्षकांना २ डोस घेण्याचे बंधनकारक आहे त्याप्रमाणे ) त्याचबरोबर श्री अंबाबाईच्या मंदिरापासून एक किलोमीटरपर्यंत व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांचे त्यांचे कर्मचारी सुद्धा लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असावेत याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी. तसेच सॅनिटायझेशन,शारीरिक अंतर ठेवणे,मास्क वापरणे हे भक्तांसाठी बंधनकारक करावे आणि त्त्याचप्रमाणे कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या भक्तांची अँटीजेन टेस्ट करण्याची सक्ती करावी.
कारण गेले तीन-चार महिने कोल्हापूर कडक लॉकडाऊन मध्ये होते. दुकानांमध्ये,हॉटेल्समध्ये कोरोना ची नियमावली पाळली जात आहे की नाही हे प्रशासनाने कडक लक्ष देऊन पहावे.
मागील लोकडॉऊनमुळे कोल्हापूरच्या व्यापाराचे व उद्योगधंद्यांचे सामान्य कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोना पुन्हा वाढल्यास हे न भरून येणारे नुकसान होईल. कोल्हापूरमध्ये नवदुर्गा आहेत.या नवदुर्गांच्या दर्शनासाठी सुद्धा मोठी गर्दी होते तेव्हा त्या ठिकाणी सुद्धा गर्दी होणार नाही आणि कोरोनाची नियमावली पूर्णपणे पाळली जाईल याच्याकडे ही प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच सर्व नवदुर्गा मंदिरांच्या परिसरामध्ये लसीकरणाचे कॅम्प सुरू करावेत जेणेकरून कोल्हापूरमध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण होईल.
कोल्हापूर नगरी क्रीडा आणि कला क्षेत्राची पंढरी आहे. कोल्हापुरातून अनेक नामवंत खेळाडू निर्माण झाले आहेत. तेव्हा कोल्हापूरच्या क्रीडा विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोल्हापूरमधील खेळाची मैदाने कशी सुस्थितीत राहतील आणि त्याचा फायदा खेळाडूंना कसा होईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. येणाऱ्या भाविकांच्या पार्किंगची सोय करताना कोल्हापुरातील कोणत्याही खेळाच्या मैदानाचा वापर करू नये. जिल्हाधिकारी यांनी महापालिका प्रशासनाला महापालिकेच्या स्वता:च्या मालकीची पार्किंगच्या सर्व जागा खुल्या करण्याचे आदेश द्यावेत कारण गेले वर्षभर खेळाडूंना सरावासाठी मैदाने उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे खेळाडूंचे मोठे नुकसान झाले आहे आता खेळाची मैदाने सुरू होतात तोपर्यंत ती पार्किंगसाठी बंद करू नयेत. पार्किंग साठी इतर जागांचा विचार करावा अशी विनंती
कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समिती ने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भाऊ घोडके, अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, महेश जाधव, चंद्रकांत पाटील, राजेश वरक, विनोद डुणूंग, शंकरराव शेळके पप्पू सुर्वे आदींच्या सह्या आहेत.