कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा :आमदार चंद्रकांत जाधव
कोल्हापूर/प्रतिनिधी : राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण करूनच, शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली आहे.
आमदार जाधव यांनी आज मुंबईत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाल्याने, येत्या १७ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केलेली आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाला असला तरी, तिसऱ्या लाटेचे संकेत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे आरोग्य विभागाला सांगीतले आहे. यांमुळे तिसरी लाट थोपवण्याबरोबर लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबवावी. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील सर्व शाळा सुरू कराव्यात.