सांगली जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदीसाठी ४ कोटींचा निधी मंजूर – पालकमंत्री जयंत पाटील यांनी मानले ग्रामविकास मंत्र्यांचे आभार
सांगली / (जि.मा.का.) : १४ व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेतून सांगली जिल्हा परिषदेला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत ४ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी विशेष आभार मानले आहेत.
कोल्हापूर येथील एका कार्यक्रमात सांगली जिल्ह्याला रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मदत मिळावी, अशी मागणी पालकमंत्री जयंत पाटील यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली होती. त्यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मदतीचे आश्वासन दिले होते आणि आज त्यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.