प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धेत सहभागी व्हा
समाजमन व महिला दक्षता समितीतर्फे आवाहन
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापुरातील समाजमन सामाजिक संस्थेने आत्महत्या रोखण्यासाठी से नो टू सुसाईड ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून समाजमन व महिला दक्षता समिती यांच्यामार्फत खुल्या गटात आत्महत्या हा विषय घेवून प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. स्पर्धेत हौशी कलाकारांसह महाविद्यालयाच्या संघांनाही भाग घेता येईल. या स्पर्धेत इच्छुकांनी २० एप्रिलपर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन समाजमन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महेश गावडे आणि महिला दक्षता समितीच्या तनुजा शिपूरकर यांनी केले आहे.
समाजमन संस्थेने अलिकडेच नो सुसाईड आस्क मी, ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून समाजमन संस्थेने महिला दक्षता समितीच्या संयुक्त विद्यमाने आत्महत्या रोखण्याच्या उदेशाने व आत्महत्या कशा टाळता येतील, यावर उपाययोजना करण्याच्या हेतूने आत्महत्या हा विषय घेवून प्रबोधनपर पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेत सहभागी होवू इच्छिणाऱ्यांनी आपली नावे आयोजकांकडे आधी नोंदवावी लागतील. पथनाट्याचा विषय समाजप्रबोधनपर असल्याने संहिता जाणकारांकडून तपासून घेतली जाईल. पथनाट्यात कोणत्याही व्यक्ती, समाज अथवा समुहाबद्दल गैरशब्द वा अपशब्द असता कामा नयेत. इच्छुक महाविद्यालयाचे कला संघ, हौशी कलाकार अथवा संस्थांनी अधिक माहिती व नावनोंदणीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे
स्पर्धेसाठी कोणतीही एंट्री फी आकारली जाणार नाही स्पर्धेसाठी रोख रकमेची पारितोषिक दिली जाणार आहेत परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील
इच्छुकांना २० एप्रिलपर्यंत आपला सहभाग नोंदवावा लागेल परीक्षेचा काळ असल्याने स्पर्धेची तारीख व वेळ तसेच स्थळ नंतर जाहीर करण्यात येईल अधिक माहितीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा
महेश गावडे : ९८२३७६७८५८
अनुराधा मेहता : ९९७५५०९०७६
बाळासाहेब उबाळे: ९३२५४०३२१९