बाळासाहेबांच्या नंतर लोणंदकरांच्या मी ठामपणे पाठीशी – पृथ्वीराज चव्हाण
लोणंद/प्रतिनिधी : लोणंदचे नेते बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण, खा श्रीनिवास पाटील, आ. मकरंद पाटील आदींच्यासह भागातील प्रमुख नेते मंडळी व काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब बागवान यांचे काल निधन झाल्यानंतर आज त्यांची अंत्ययात्रा लोणंद शहरातून काढण्यात आली व त्यानंतर झालेल्या शोकसभेत श्रद्धांजली अर्पण करताना माजी मुख्यमंत्री आ पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, सातारा जिल्हा काँग्रेसचे आधारस्तंभ व लोणंदवर प्रेम करणारे स्व बाळासाहेब बागवान यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. बाळासाहेब व माझा अत्यंत घनिष्ठ संबंध कायम राहिला आहे. माझ्या आई स्व काकीसाहेबांच्यापासून बाळासाहेब काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले आहेत. त्यांनी लोणंद व खंडाळा तालुक्यातील जनतेसाठी अहोरात्र कष्ट घेतले. काँग्रेस पक्ष या भागात वाढविण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते.
लोणंदच्या विकासासाठी जसे बाळासाहेब आग्रही असायचे त्याचप्रमाणे लोणंदकरांच्या साठी मी कायमच आग्रही असेन आपण कुणीही बाळासाहेबांच्यानंतर लोणंद पोरका झाला असे समजू नये हक्काने माझ्याकडे तुम्ही कधीही येऊ शकता, मी लोणंदकरांच्या पाठीशी कायम उभा असेन असा विश्वास आज शोकसभेत आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.यापुढे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, बाळासाहेब स्वतः वकिलीची पदवी घेतलेली असून सुद्धा अंगावर काळा कोट न चढविता जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ते कायम आग्रही राहिले. नीरा-देवधर धरण प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी बाळासाहेबांनी मोठा लढा उभारला होता. सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी १९९५ साली पाणी परिषद घेतली होती या परिषदेला संबंध राज्यातून अनेक नेते उपस्थित होते. पाण्यासाठी लढा देणाऱ्या बाळासाहेबांच्यासाठी आज आपल्या डोळ्यातून पाणी आले आहे असे भावोद्गार पृथ्वीराज बाबांनी आजच्या शोकसभेत काढले. काँग्रेस पक्षावर अत्यंत प्रेम करणारा ती विचारधारा तळागाळापर्यंत नेणारा कट्टर काँग्रेस विचारांचा कार्यकर्ता आज हरपला याचे खूप मोठे दुःख काँग्रेसवर आहे.
चौकट
आज पृथ्वीराज बाबा बाळासाहेबांची वाट पाहत बसले पृथ्वीराज बाबा पुण्याहून येताना अनेकदा लोणंद मार्गे येत असत व त्या प्रत्येक वेळी बाळासाहेबांना शासकीय विश्रामगृह येथे भेटत असत. या प्रत्येक भेटीवेळी बाळासाहेब पृथ्वीराज बाबा येण्याच्या आधी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सहित उपस्थित असत पण आज तीच वेळ बदलली होती पृथ्वीराज बाबा आज वाट पहात बसले होते बाळासाहेबांच्या भेटीसाठी. अत्यंत मन हेलवणारा हा प्रसंग बाळासाहेबांच्या मुलाकडून व्यक्त करण्यात आला.