सीपीआर रुग्णालयात तीन महिन्यात कान,नाक,घशाच्या १३५ गंभीर तर १६३ किरकोळ शस्त्रक्रिया यशस्वी
कोल्हापूर /प्रतिनिधी : गरीबाचा आधारवड असणाऱ्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय अर्थात “सीपीआर “मध्ये १ डिसेंबर ते ९ मार्च अखेर कान,नाक,घशाच्या १३५ गंभीर गुंतागुंतीच्या तर १६३ किरकोळ स्वरूपातील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एस.एम.मोरे आणि विभाग प्रमुख डॉ. अजित लोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोरोना कालावधीत सीपीआर रुग्णालय कोव्हिड रुग्णालय म्हणून घोषित झालं होतं. त्यामुळे कोरोना शिवाय इतर सर्व विभाग बंद करण्यात आले होते.मात्र २६ नोव्हेंबर नंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर सीपीआर मध्ये इतर सर्व उपचार सुरू करण्यात आलेतं.दरम्यान रुग्णालयात १ डिसेंबर ते ९ मार्च अखेर सर्व प्रकारच्या कान,नाक,घशाच्या १३५ गंभीर गुंतागुंतीच्या तर १६३ किरकोळ स्वरूपातील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या आहेत. यासाठी कान ,नाक,घसा विभागाची १० जणांची टीम कार्यरत असून डॉ. वासंती पाटील, डॉ. मिलिंद सामानगडकर ,डॉ. उल्हास मिसाळ यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. सध्या कान-नाक-घसा विभागामध्ये अनेक जोखमीच्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया पार पडत आहेत. या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात खर्च येतो. जे खाजगी हाॅस्पिटलमध्ये उपचार तेच सीपीआर मध्ये उपचार असून संबंधित रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी डॉ. अजित लोकरे यांनी केले.पत्रकार परिषदेला डॉ. मिलिंद सामानगडकर, डॉ. वासंती पाटील उपस्थित होत्या.