विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रिकरणाने काम करावे -आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर
कोल्हापूर/प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर आबांनी ग्रामस्वच्छता, तंटामुक्त सारख्या योजना राबवून गावांचा चेहरा-मोहरा आणि राज्याचे चित्रच बदलले. ही स्वच्छता चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी विकासाची संकल्पना घेऊन गावांनी एकत्रिकरणाने काम करावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी केले. आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार वितरण सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आज करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, उपाध्यक्ष सतीश पाटील, बांधकाम व आरोगय सभापती हंबीरराव पाटील, शिक्षण व अर्थ सभापती प्रविण यादव, महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात आर. आर. (आबा) पाटील यांच्या प्रतिमा पुजनाने आणि दिप प्रज्वलनाने झाली. सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर म्हणाले, आबांच्या ६ व्या स्मृतीदिनानिमित्त हा पुरस्कार वितरण होत आहे. गावाने विकासाची संकल्पना घेऊन हातात हात घालुन काम करावे. शांतता व सुव्यवस्थेसाठी गावचा सहभाग, एकत्रिकरण गरजेचे आहे. सांडपाण्याचा विषय महत्वाचा असून पंचगंगा नदी प्रदूषण थांबविण्यासाठी नदीकाठच्या मोठ्या गावांनी सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रदूषण मुक्तीसाठी एखादी चांगली योजना तयार करावी आणि सुंदर गाव ही योजना अधिका-अधिक वाढीस लागावी.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील म्हणाले, सरपंच म्हणजे गावचा पाया आहे. गावच्या लोकांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. ती अधिका-अधिक करावी. जिल्ह्यामध्ये तीन-तीन मंत्री असल्याने जिल्ह्याच्या विकासासाठी अडचणीचा भाग राहीला नाही, असे सांगून पुरस्कार प्राप्त गावांना प्रत्येकी दोन लाखाचा निधी जाहीर केला. उपाध्यक्ष सतीश पाटील यांनीही आपल्या भाषणात जिल्हास्तरीय विजेत्या दोन गावांना प्रत्येकी १० लाखाचा निधी जाहीर केला. स्वागत प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी स्पर्धेचे निकष आणि उद्दिष्ट सविस्तर सांगितले.
तालुकास्तरीय विजेती गावे वेळवट्टी, ता. आजरा,
पिंपळगाव, ता.भुदरगड लकिकट्टे, ता. चंदगड
निवडे, ता. चंदगड करंबळी, ता. गडहिंग्लज
संभापूर आणि मिणचे (विभागून) ता. हातकणंगले बहिरेश्वर, ता. करवीर
मुगळी, ता. कागल वेखंडवाडी, ता. पन्हाळा
कुंभारवाडी, ता. राधानगरी कोतोली, ता. शाहूवाडी शिवनाकवाडी, ता. शिरोळ
प्रत्येक गावाला १० लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हास्तरीय प्रथम ठरलेल्या कागल तालुक्यातील पिराचीवाडी आणि हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावास विभागून ४० लाख रुपये व सन्मान चिन्ह देण्यात आले.
शिक्षण सभापती श्री. प्रविण यादव यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास जि. प सदस्य, अधिकारी, पदाधिकारी, सरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.