१५ फेब्रुवारीपर्यंत महा-रेशीम अभियान
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून सुरूवात
कोल्हापूर/प्रतिनिधी : आजपासून सोमवार १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या महा-रेशीम अभियान २०२१ च्या रेशीम रथाला जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते हिरवा बावटा दाखवून आज सुरूवात करण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात या अभियानाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलंडे, रेशीम विकास अधिकारी संजय शिंदे, प्रकल्प अधिकारी बी.एम. खंडागळे, जिल्हा मनरेगा समन्वयक संजय पवार, तांत्रिक सहाय्यक तानाजी शिर्के, वाय.ए. पाटील, शेतकरी तानाजी पाटील उपस्थित होते.
महा-रेशीम अभियानांतर्गत आजपासून १५ फेब्रुवारीअखेर आयोजित केलेला महा-रेशीम अभियान रथ गडहिंग्लज समूहांतर्गत सरोळी, कुमरी, कानडेवाडी, कळीवडे, मुरकुटेवाडी, करवीर समुहांतर्गत म्हाळुंगी, कोतोली, पुनाळ, राधानगरी, कोथळी, पणोरी व हातकणंगले समुहातंर्गत यळगुड, लक्ष्मीवाडी, वाळवे खुर्द, सोनाळी, तळसंदे, व्हनाळी या गावात फिरवण्यात येणार आहे. रथामार्फत या कालावधीमध्ये ऑनलाईन नोंदणी होणार असल्याने लाभार्थींनी परिपूर्ण कागदपत्रांसह नोंदणी करावी. नंतर ऑनलाईन नोंदणी बंद होणार असल्याने अभियान कालावधीत जे लाभार्थी नोंदणी करतील असे लाभार्थी सन २०२१-२२ सालाकरीता मनरेगा योजनेंतर्गत शासनाच्या निकषानुसार पात्र राहतील. या नोंदणीच्या कार्यक्रमासाठी समूहनिहाय/ ग्रामपंचायतनिहाय कृती आराखडा तयार केला असून त्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व तलाठी यांच्या समन्वयातून ग्रामस्तरापर्यंत योजनेची जनजागृती करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी श्रेणी-२, जिल्हा रेशीम कार्यालय, ५६४ ई-वॉर्ड, व्यापारी पेठ, शाहुपूरी, कोल्हापूर येथे दूरध्वनी क्र. ०२३१-२६६६६८२ व reshimkolhapur@gmail.com या ई-मेल वर संपर्क करावा, असे आवाहनही रेशीम विकास अधिकारी श्री. शिंदे यांनी केले आहे.