भंडारा दुर्घटनेबद्दल आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी तीव्र दुःख व्यक्त असून सखोल चौकशीचे दिले आदेश
मुंबई/प्रतिनिधी : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून या घटनेची गंभीरपणे दखल घेत दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कुटुबियांच्या दु:खात आपण सहभागी असल्याचे म्हटले त्यांनी आहे. तसेच रुग्णालयाची सेवा पूर्ववत करून व अन्य बालकांची बाल तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करावी आणि आवश्यक ती काळजी घ्यावी असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
सदर दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या बालकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपयांची मदत देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व रुग्णालयांची वीज यंत्रणा आणि अग्निशमन यंत्रणेची तत्काळ तपासणी करून सुधारणा करण्याच्या सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागाला दिल्या आहेत.भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या मृत्यूची घटना अत्यंत दुःखद असून मन व्यथित करणारी आहे असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे. या घटनेसंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह आपण सतत तेथील परिस्थितीची माहिती घेत असून मा. मुख्यमंत्री आणि मा. उपमुख्यमंत्री हे देखील भंडारा जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्कात राहून वेळोवेळी महत्त्वाचे निर्देश देत असल्याचे राज्यमंत्री यड्रावकर यांनी स्पष्ट केले आहे.