सत्तेत असल्यावर जवळ असणारी माणसे ही सत्तेची सूज असतात,जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचा टोला
महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा महाविकास आघाडीतर्फे सत्कार
कोल्हापूर/प्रतिनिधी :सत्तेत असल्यावर माणसे जवळ येतात. मात्र ही सत्तेची सूज असते. जिवाभावाची माणसे मिळवायला आयुष्यभर सेवा करावी लागते असा टोला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. ते महासैनिक हॉल येथे आयोजित नूतन आमदार सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. महाविकास आघाडीचे पुणे पदवीधर मतदार संघाचे नूतन आमदार अरुण लाड आणि शिक्षक मतदार संघाचे नूतन आमदार जयंत आसगावकर यांचा जाहीर सत्कार समारंभ ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महासैनिक दरबार हॉल येथे पार पडला. यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते नूतन आमदारांचा सत्कार कोल्हापुरी फेटा बांधून आणि भव्य पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.
याप्रसंगी बोलतांना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पदवीधर आणि शिक्षक यांची निवडणूक ही बहुजन समाजाची नाही तर विशिष्ट विचारधारेची आहे. असा समज विरोधकांचा होता. मात्र या निवडणुकीत ही निवडणूक आपली आहे म्हणून कार्यकर्त्यांनी जीवाचे रान कारून मताधिक्य वाढविले कार्यकर्त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेऊन दोन्ही उमेदवारांना निवडून दिले असल्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. तर केंद्रातील भाजप सरकारवर निशाण साधताना नामदार मुश्रीफ यांनी हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे. आशा लोकांना भुईसपाट केले पाहिजे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला आपण पाठिंबा देऊया आमची शेती धनदांडग्याच्या घशात घालणार नाही असा निर्धार व्यक्त केला. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सत्तेत असताना त्यांना सांगितले होते ही सत्तेची सूज आहे सुजीसाठी लोक जवळ येत असतात. पैसे उधळून लोक जवळ येत नाहीत. यासाठी लोकांची आयुष्यभर सेवा करावी लागते. असा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला.
यावेळी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या प्रयत्नामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचा झेंडा फडकावलाय. याबद्दल आभार व्यक्त करून संघटित ताकत पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या मागे राहिली. या निवडणुकीत पाच जिल्ह्यातील पक्षीय ताकत गरजेची होती त्यामुळे ही निवडणूक लढवली. गेल्या बारा वर्षात विरोधकांनी काम केले नाही याचा दाखला देण्याचे काम मतदारांनी केले पहिल्या फेरीत निवडून येऊ असा दावा करणाऱ्यांना आणि फक्त ग्रामपंचायत राहिलीय असं म्हणणाऱ्यांना लोकशाही काय आहे, लोकांची ताकद काय आहे हे या पदवीधर व शिक्षक निवडणुकीवरून समजले असेल. पाचही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून दिले. या दोन्ही उमेदवारांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच विकासाला चालना मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. तर भविष्यातल्या निवडणुकाही आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढविणार असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार प्रा संजय मंडलिक यांनी ही निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करणारी निवडणूक आहे. पुढच्या काळात महाविकास आघाडीची वाटचाल ही महत्वपूर्ण असणार आहे. शेतकरी कष्टकरी आणि सामान्य जनतेच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे राहील अशी ग्वाही दिली. तर खासदार धैर्यशील माने यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून विरोधकांना सुरुंग लावण्याचे काम कोल्हापुरातून केले गेले आहे महाविकास आघाडीची ही कामगिरी राज्यात उत्कृष्ट आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांची निवडणूक आहे असे मानून कार्यकर्त्यांनी जीवाचे राण केले. त्यामुळे हा विजय सोपस्कर झाला असल्याचे खासदार माने यांनी सांगितले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पदवीधर आणि शिक्षकांनी साथ दिली. योग्य नियोजन आणि कार्यकर्त्यांनी केलेली कामगिरीमुळे ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकता आली. या निकालामुळे महाविकास आघाडीत सर्वजण जमिनीवर राहून कार्य करतो हा संदेश राज्यात गेलेला आहे. त्यामुळे यापुढेही असेच एकत्र राहून महाविकास आघाडीला बळकट करण्यासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी आमदार चंद्रकांत जाधव यांनी पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील आमदारांची निवड झाल्यानंतर महाविकास आघाडीची ताकद वाढली असून नक्कीच भविष्यात चांगली कमगिरी होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार राजेश पाटील यांनी या निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांनी उमेदीने कामाला लागून इतिहास घडविला. स्वच्छ चारित्र्य आणि समाजाशी बांधिलकी असलेले उमेदवार निवडून दिले असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार प्रा जयंत आसगावकर यांनी हा सत्कार स्वीकारतांना आपल्याला महाविकास आघाडीचा अभिमान वाटतो तर शिक्षकांनी आपल्यावर विश्वास ठेवला तो नक्कीच सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली. तर शिक्षकांची जी प्रलंबित कामे आहेत ती कामे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन पाठपुरावा केल्यामुळे मार्गी लागली आहेत. यापुढेही शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी चांगली कामगिरी करू असा विश्वासही आमदार आसगावकर यांनी दिला.
तर आमदार अरुण लाड यांनी दोघांना निवडून आणायचे म्हणून सर्वजण कामाला लागले होते. त्यामुळे सांगली जिल्ह्याबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याचा मोठा वाटा माझ्या विजयात आहे. यापूर्वी निवडून गेलेल्यानी बारा वर्षात काही काम केले नाही. पदविधरांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत त्यामुळे मतदारांनी त्यांची जागा दाखवून दिली असल्याची टीका विरोधकांवर केली.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी या निवडणुकीत शिवसेनेचा वाटा हा महत्वाचा असून यापुढेही शिवसेना पाठीशी खंबीरपणे उभी असेल असा विश्वास दिला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, शिक्षक नेते भरत रसाळे, अनिल घाटगे यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या सत्कार समारंभास महापौर निलोफर आजरेकर,माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती प्रवीण यादव, आम.राजीवबाबा आवळे,महिला आघाडीच्या सौ.सरलाताई पाटील,शहराध्यक्ष सौ.संध्या घोटणे, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह माने, गगनबावडा पंचायत समिती सभापती संगीता पाटील, करवीर पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे यांच्यासह निमंत्रित मान्यवर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.