१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी
-जिल्हाधिकारी दौलत देसाई
कोल्हापूर/ (जिल्हा माहिती कार्यालय) : शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. मतदान निर्भयपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक कामकाजाबाबतचा आढावा जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सर्व उपविभागीय अधिकारी तहसिलदार यांच्याशी संवाद साधून घेतला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊ गलंडे, रोहयो च्या उप जिल्हाधिकारी स्मिता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, उप जिल्हाधिकारी हेमंत निकम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय राजमाने, जिल्हा खनिकर्म अधिकारी अमोल थोरात, तहसिलदार अर्चना शेटे उपस्थीत होते.
जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे आदर्श करा. पाणी, स्वच्छतागृहे, मदत कक्ष, आवश्यक फर्निचर यांची सुविदा करावी. कोविडच्या अनुषंगाने सामाजिक अंतर, सॅनेटायझरचा वापर, थर्मल गन चा वापर, विनामास्क मतदारांना देणे, याबाबत खबरदारी घ्यावी. पल्स ऑक्सीमीटर ची सुविधाही ठेवावी. मतदान केंद्रांचे निर्जंतुकिकरण करुण घ्यावे. आवश्यक मनुष्यबळांची नेमणूक झाल्याची खात्री करावी. दक्ष राहून मतदान केंद्रांची काटेकोर तपासणी करावी.
जिल्ह्यातील २८१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे, जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले याबाबतची पूर्वतयारी पूर्णत्वास आली आहे. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ३० तारखेला आपआपल्या मतदान केंद्रावर जातील. त्या दिवशी पुन्हा त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. मतदान निर्भय आणि मुक्तपणे होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षिततेसाठी पोलीस दल नियुक्त आहे. मतदान केंद्राच्या बाहेरही पोलीस यंत्रणा आणि गृहरक्षक दल यांची नियुक्ती केली आहे. कोणताही गैरप्रकार होणार नाही याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन तयार आहे असेही ते म्हणाले.