सोमवारपासून शाळा होणार सुरु,महापालिका प्रशासनाची तयारी गतीमान,कोरोनाच्या पर्श्वभूमीवर ३७० शिक्षकांची तपासणी तर ६५ शाळांचे निर्जंतुकीकरण
कोल्हापूर/प्रतिनिधी : येत्या सोमवारपासून नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. कोरोनाच्या पर्श्वभूमीवर आतापर्यंत शहरातील ३७० शिक्षकांची तपासणी तर जवळपास ६५ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून उर्वरित शिक्षकांची तपासणी व शाळांचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली.सोमवार २३ नोव्हेंबर २०२० पासून ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोल्हापूर शहरातील ११२ शाळा सुरु करण्यात येणार आहेत. या शाळामधील ११९५ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचीही कोरोनाच्या अनुषंगाने आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे. महापालिकेच्या शहरातील ११ नागरी आरोग्य केंद्रे व आयसोलेशन हॉस्पिटलसह १२ ठिकाणी कोरोना चाचणीची मोफत सुविधा उपलब्ध केली असून दि.२२ नोव्हेंबर २०२० पर्यंत शिक्षाकाची चाचणी पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. या सर्व शाळा व परिसराचे निर्जंतुकीकरण व स्वच्छतेचे कामही गतीने सुरु आहे. हया कामाची जबाबदारी प्रशासन अधिकारी शंकरराव यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शहरस्तरीय शालेय आपत्कालीन समितीही गठीत करण्यात आली असल्याचेही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले. शहरातील ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरु करत असतांना शाळांचे १०० टक्के निर्जंतुकीकरण व स्वच्छताकरण्याबरोबरच शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देणे अनिवार्य केले असल्याचे सांगून प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे म्हणाल्या, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कोव्हिड १९ चाचणी करणे, वर्गनिहाय पालक समितीची बैठक घेणे, शाळेच्या अंतर्गत व बाहयपरिसरात किमान ६ फूट शारीरिक अंतर ठेवणे, यासाठी चौकोन अथवा वर्तुळ तयार करणे, सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कायम मास्कचा वापर करण्याबरोबरच त्यांची दररोज ऑक्सिजण व तापाची चाचणी करणे बंधनकारक केले आहे. तसेच विद्यार्थी वाहतुकीच्या वाहनांचे रोज निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचनाही शिक्षण विभागास दिल्या असल्याचेही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.पालकांनी योग्य दक्षता घेवून न घाबरता मुलांना शाळेत पाठवावे. याबाबत प्रशासन अधिकारी यांनी सर्व मुख्याद्यापकांना व्हीसीव्दारे मार्गदर्शन केले असून मुख्याद्यापक तसेच प्राचार्य स्तरावर शाळा सुरु करण्यासाठी कार्यवाही गतीने सुरु केली आहे.तसेच पालकांनी आपल्या मुलांना योग्य दक्षता घेवून न घाबरता शाळेत पाठवावे, असे आवाहनही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.शाळा सुरु करत असतांना शिक्षण विभागामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी व खबरदारीची माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. वर्गखोली तसेच स्टाफरुममधील बैठक व्यवस्था शारीरिक अंतराच्या नियमांनुसार करण्यात येत आहे. तसेच वर्गामध्ये एका बाकावर एक विद्यार्थी याप्रमाणे नावानिशी बैठक व्यवस्था करण्याचे निर्देशही संबंधितांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती बंधनकारक नसून पूर्णत: पालकांच्या संमतीवर अवलंबून असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु होत असून शासनाच्या दि.१० नोव्हेंबर २०२० रोजीच्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्यास महापालिका प्रशासनाने सर्वोच्च् प्राधान्य दिले आहे. शासनाच्या सूचनाबाबत तसेच कोरोना प्रतिबंधक सर्व उपाययोजनांची शाळा व्यवस्थापनाने आवश्यकती दक्षता व खबरदारी घेण्याच्या सक्त सूचना दिल्या असल्याचेही महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्पष्ट केले.