पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले पत्रकार नंदकुमार वेठे यांचे निधन
कोल्हापूर/प्रतिनिधी : ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार बापूराव वेठे (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने गुरूवार दि. १९ रोजी निधन झाले. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नंदकुमार वेठे यांनी दैनिक केसरीमधून पत्रकारितेची सुरुवात केली. त्यानंतर दैनिक सामना तसेच दैनिक पुण्यनगरी यामध्ये त्यांनी काम केले. विशेषत: गुन्हेविषयक वार्तांकनात त्यांचा हातखंडा होता. कोणत्याही बातमीच्या तळापर्यंत जाऊन माहिती काढण्याचे कसब त्यांना आत्मसात होते. त्यामुळेच त्यांचा मोठा जनसंपर्क निर्माण झाला होता.
पत्रकारांच्या कल्याणासाठी एखादी संघटना असावी म्हणून प्रेस क्लबची संकल्पना मांडण्यात आली. तेव्हा पत्रकारांची संघटना असू शकते काय, असा सवाल काही जणांनी विचारला होता. तेव्हाही ९ पत्रकारांनी प्रेस क्लब उभा केला. त्यामध्ये वेठे हे संस्थापक अध्यक्ष होते. या संघटनेशी त्यांची नाळ इतकी जुळली होती की ते प्रत्येक कार्यक्रमात हक्काने सहभागी होत. गुन्हेविषयक वार्तांकन करताना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी क्राईम रिपोर्टरस असोसिएशनची बांधणी केली होती.
गुन्हेविषयक तसेच राजकीय, सामाजिक विषयावर त्यांनी लेखन केले. रिक्षा व्यवसायाबद्दल त्यांनी केलेले लेखन लोकप्रिय झाले होते, या लेखमालेचे ‘प्रवास रिक्षाचा’ हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.शिवाजी पेठेतील ब्रम्हेश्वर पार्क परिसरातील सामाजिक कामात ते अग्रेसर होते. शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते होते.
शिवाजी तरूण मंडळाचे सक्रीय सदस्य होते. अचानक तरूण मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. अ.भा. ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष, ब्राम्हण महासंघाचे संघटक, ब्रम्हेश्वर पार्क सोसायटीचे सदस्य अशा पदावर त्यांनी काम केले. महाराणी लक्ष्मीबाई पतसंस्थेचे व्हा.चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले. स्मशानभूमीस शेणीदान हा उपक्रम १९९८ मध्ये त्यांनी सर्वात आधी सुरू केला.
गणेशोत्सवात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग भाविकांना मूर्ती घरपोच करण्यासाठी रिक्षा सुविधा देण्याची संकल्पनाही त्यांनी अंमलात आणली. समाजभान जपणार्या, चळवळी स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार मोठा होता. अल्पशा आजाराने दि. १९ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले असून रक्षाविसर्जन शनिवार दि. २१ रोजी सकाळी ८ वाजता आहे.