प्रगती नेत्र रुग्णालय सुवर्णमहोत्सव वर्षपूर्ती निमित्त कृतज्ञता सोहळा

0
57

कोल्हापूर , ता. १६ : २५ नोव्हेंबर १९७३ रोजी संस्थापना झालेल्या कोल्हापुरातील डॉ. अतुल जोगळेकर यांच्या प्रगती नेत्र रुग्णालयाने सुवर्ण महोत्सवी टप्पा गाठला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षपूर्ती निमित्त प्रगती सुपरस्पेशालिटी आय केअर तर्फे ता. १७ ते २४ नोव्हेंबर पर्यंत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवडाभर दुपारी १ ते ४ पर्यंत नेत्ररोग चिकित्सा उपचार शिबीर, राजारामपुरी ९वी गल्ली, कोल्हापूर येथे आयोजित केले असून बालकल्याण संकुल येथे लहान मुलांची नेत्रतपासणी, मातोश्री वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची मोफत शस्त्रक्रिया व नेत्रदान जागृतीसाठी व्याख्यान, आदींचा समावेश आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्ती निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आठवडाभर चालणाऱ्या शिबीराचा ज्येष्ठ नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. मंदार व डॉ. अतुल जोगळेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.

 डॉ जोगळेकर म्हणाले. . या सामाजिक उपक्रमाची सांगता ता २५ नोव्हेंबर रोजी ५० व्या वर्धापन दिनाला कृतज्ञता सोहळ्याने करण्यात येणार आहे. या दिवशी सकाळी ११ वा . हॉटेल पॅव्हेलियन येथे राज्यसभा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कृतज्ञता सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल येथील लक्ष्मी इन्स्टिट्यूटचे वैद्यकीय संचालक व ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर हे उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात डॉ. सुहास हे सामाजिक विषयावर मार्गदर्शन करतील. डॉ. अतुल व प्रगती नेत्र रुग्णालयाचा ५० वर्षाचा आढावा घेणाऱ्या 'प्रगतीची स्मरणयात्रा' या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येईल.

प्रगती नेत्र रुग्णालयाच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत मोलाचे योगदान असलेल्या सर्व सहयोगी डॉक्टरांना व कर्मचारी वृंदाला या सोहळ्यामध्ये सन्मानित केले जाणार आहे. यावेळी डॉ. वसुधा जोगळेकर व डॉ. विभावरी जोगळेकर या उपस्थित होत्या.