खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्याला यश पाच नोव्हेंबर पासून कोल्हापूर – पुणे मार्गावर सह्याद्री एक्सप्रेस धावणार
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोरोना कालावधीपासून म्हणजे गेल्या तीन वर्षापासून बंद असणारी सह्याद्री एक्सप्रेस आता पुन्हा सुरू होणार आहे. पाच नोव्हेंबर पासून दररोज सह्याद्री एक्सप्रेस सुरू होईल. मात्र सध्या कोल्हापूर- पुणे – कोल्हापूर मार्गावर ही विशेष रेल्वे धावणार असून, लवकरच ती पूर्ववत मुंबईपर्यंत जाईल. सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू व्हावी, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.कोरोना काळात कोल्हापूर मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्सप्रेस रेल्वे गाडी बंद झाली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेस सुरू केलीच नाही. त्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने केंद्रीय रेल्वे मंत्रालय तसंच रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना आज यश आले. ५ नोव्हेंबर पासून पुन्हा सह्याद्री एक्सप्रेस सुरू होत आहे. मात्र सध्या तरी ही गाडी पुण्यापर्यंत धावणार आहे. ५ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत, कोल्हापूरातून रात्री ११.३० वाजता सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्या दिवशी सकाळी ७.४५ वाजता पुण्यात पोचेल. तर पुण्याहून रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस, दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी कोल्हापुरात पोहोचेल. सध्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्लॅटफॉर्म बांधणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, सह्याद्री एक्सप्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावेल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. मात्र ५ नोव्हेंबर पासून सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर पुणे मार्गावर धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.