कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी १ लाख १० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
कोल्हापूर /प्रतिनिधी : १ लाख १० हजाराची लाच घेताना कोल्हापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रशेखर विश्वनाथ साखरे (रा.आई निवास १५६/२ प्लॉट नंबर ५, राजगुह हौसिंग सोसायटी, वृंदावन व्हीला शेजारी विश्रामबाग, सांगली) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयात ही कारवाई करण्यात आल्याने क्रीडा क्षेत्रात खळबळ माजली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी आहे, तक्रारदार हे वेगवेगळ्या सरकारी विभागास साहित्य पुरवठा करण्याचे काम करतात. त्यांनी कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयास आवश्यक असलेले साहित्य हे ऑनलाइन महा टेंडर वरती आलेल्या जाहिरातीनुसार पुरवले होते. या साहित्याचे एकूण बिल हे ८,८९,२००/- रुपये झाले होते. हे बिल मंजूर करण्यासाठी साखरे यांनी तक्रारदार यांच्याकडे बिल रकमेच्या अंदाजे १५ टक्के प्रमाणे लाच मागणी केली. तडजोडीअंती १,१०,००० /- लाचेची मागणी करून ती लाच रक्कम आरोपी साखरे यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. त्यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.