मेरी मिट्टी मेरा देश अभियान अर्थात माझी माती, माझा देश अभियानांतर्गत उद्या ९ ऑगस्टपासून जिल्ह्यात विविध कार्यक्रम
उद्या सकाळी १० वा. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात पंचप्रण शपथ देणार
कोल्हापूर/ (जिमाका) : उद्या सकाळी दि.९ ऑगस्ट रोजी १० वा. शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात पंचप्रण शपथ दिली जाणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिपत्रक देण्यात आले आहे. तसेच मेरी मिट्टी मेरा देश अभियान अर्थात माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमानुसार आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ९ ते १४ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी कळविले आहे. या उपक्रमामध्ये शिलाफलक उभारणी अंतर्गत ग्रामपंचायत क्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले अशा थोर व्यक्तींची नावे निश्चित करुन शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. वसुधा वंदन अंतर्गत गावातील योग्य ठिकाण निवडून ७५ देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करुन अमृतवाटिका तयार करण्यात येणार आहे.स्वातंत्र्य सैनिक, वीरांना वंदन अंतर्गत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील ज्यांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान केलेल्या, निवृत्त वीरांचा (आर्मी, पोलिस दल) स्वातंत्र्य सैनिक यांच्या परिवारातील सदस्य यांचा कार्यक्रमावेळी सन्मान (शाल, बुके, श्रीफळ देऊन) करण्यात येणार आहे. पंच प्रण (शपथ) अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, गावकऱ्यांमार्फत पंच प्रण (शपथ) घेण्यात येणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रम अंतर्गत गावक्षेत्रातील (अमृत सरोवर/ शाळा/ ग्रामपंचायत इ.) एका योग्य ठिकाणी कार्यक्रम घेऊन राष्ट्रगीत गायन व तिरंगा फडकविण्यात येणार आहे. सर्व शासकिय कार्यालयांमधील अधिकारी/ कर्मचारी यांनी दिनांक-९ ऑगस्टरोजी सकाळी १० वा. पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती अंतर्गत सर्व कार्यालये, जिल्हा परिषदेकडील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या ठिकाणी उद्या दिनांक ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० पंचप्रण शपथ घेण्यात येणार आहे.