गायरानातील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तात्काळ दिलासा द्यावा – आमदार हसन मुश्रीफ यांची मागणी
कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने द्याव्यात
कोल्हापूर/प्रतिनिधी : गायरानामध्ये अतिक्रमणे केलेल्या नागरिकांच्या अतिक्रमित जागांचे नियमितीकरण करून अतिक्रमणधारकांना राज्य सरकारने तातडीने दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी आमदार हसन मुश्रीफ यांनी केली आहे. राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमणे न काढण्याच्या सूचना प्रशासनाला तातडीने द्याव्यात, असेही आमदार श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले.
आमदार श्री. मुश्रीफ यांनी पत्रकात पुढे म्हंटले आहे, गायरानामध्ये अतिक्रमण केलेल्या नागरिकांना राज्य शासनाने तात्काळ नियमितीकरण करून द्यावे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे काही दिवसांपूर्वी अशाच गायरानामध्ये अतिक्रमण केलेल्या लोकांना शासनाने नोटीसा काढलेल्या होत्या. त्यावेळी आम्ही महाविकास आघाडीमार्फत कोल्हापुरात मोर्चा काढला होता. त्यावेळेला राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची आम्ही गरज प्रतिपादीत केलेली होती.
जिथे -जिथे गायरानमध्ये अतिक्रमण केलेली आहेत. त्या अतिक्रमण केलेल्या नागरिकांचे नियमितीकरण करून यापुढील काळात अतिक्रमण होणार नाही, अशी भूमिका राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेण्याची आवश्यकता आहे. परंतु; अद्यापही तसे होताना दिसत नाही. अतिक्रमण नोटीस आलेल्या नागरिकांनी या नोटीसला रितसर आपण त्या ठिकाणी कधीपासून रहिवास करतो, तसेच अनुषंगिक संपूर्ण माहिती द्यावी.कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढू नये, अशा सूचना राज्य सरकारने प्रशासनाला द्याव्यात. राज्य सरकारने यामध्ये हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे. लाखो लोक यावर अवलंबून आहेत.