‘स्वराज्य भवन’चा भव्य लोकार्पण सोहळा : पुणे येथे स्वराज्य संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन
कोल्हापूर/प्रतिनिधी : छत्रपती संभाजीराजे यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेचे राज्य मध्यवर्ती कार्यालय पुणे शहरात साकारण्यात आले असून, शिवाजीनगर येथे असलेल्या या कार्यालयाचा भव्य लोकार्पण सोहळा शनिवार, दि. २७ मे रोजी सकाळी ०९:३० वा. पार पडणार आहे.
सदर कार्यालय संघटनेचे मुख्य तथा मध्यवर्ती कार्यालय म्हणून कार्यान्वित होणार असून ‘स्वराज्य भवन’ या नावाने ओळखले जाणार आहे. शिवाजीनगर या पुण्याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी या कार्यालयाचे स्थान असून इथून विमानतळ, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, महानगरपालिका, शासकीय कार्यालये काही मिनिटांच्या अंतरावर आहेत.या कार्यालयात पत्रकार परिषद, छोटे मेळावे, शिबीर, बैठका घेण्यासाठी छोटेखानी सभागृह आहे. तसेच स्वराज्यप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष दालन असून महिन्यातील ठराविक दिवशी राज्यभरातील जनतेला याठिकाणी संभाजीराजे यांना भेटता येणार आहे. येथे असणारे पदाधिकाऱ्यांचे दालन जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव कार्यशील राहणार आहे. त्याच बरोबरीने या कार्यालयात सुसज्ज वॉर रूम देखील साकारण्यात आलेली आहे.संघटन बांधणी, प्रसिद्धी, बैठका तसेच जनतेला भेटण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र म्हणून स्वराज्य भवन कार्यरत राहील, असे सांगण्यात येते. या कार्यालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीराजे, राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.या लोकार्पण सोहळ्यानंतर बालगंधर्व सभागृह येथे छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन संपन्न होणार आहे. या अधिवेशन करिता कोणत्याही प्रकारचा पास नसून सर्व कार्यकर्त्यांना खुला प्रवेश आहे, असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच, स्वराज्य भवन लोकार्पण सोहळा व अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे सरचिटणीस व प्रवक्ते डॉ. धनंजय जाधव, उपाध्यक्ष श्री. रघुनाथ चित्रे पाटील, प्रशांत पाटणे, गणेश सोनवणे , रेश्माताई गोसावी , निखील काची यांनी केले.