कृषी कायदा विरोधात उद्या काँग्रेसची भव्य ट्रॅक्टर रॅली ७०० ते ८०० ट्रॅक्टर होणार सहभागी
कोल्हापूर/प्रतिनिधी :केंद्रातील भाजप सरकारने आणलेल्या काळ्या कृषी कायद्या विरोधात गुरुवार दि. ५ रोजी जिल्हा काँग्रेसच्या वतीने भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ७०० ते ८०० ट्रॅक्टर या रॅलीत सहभागी होणार आहेत. राज्याचे प्रभारी
एच. के. पाटील यांच्या हस्ते या रॅलीला सुरुवात होणार असून प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री सतेज पाटील व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. येथील निर्माण चौक येथून सकाळी ९.३० वाजता या रॅलीला सुरुवात होणार आहे.
कृषी सुधारणा विधेयकांना सर्वपक्षीय विरोध होऊ लागला आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षही देशभरात रस्त्यावर उतरून संघर्ष करत आहे. महाराष्ट्रातही या काळ्या कायद्यांविरोधात काँग्रेस पक्ष संघर्ष करत असून नुक्ताच १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने भव्य ‘शेतकरी बचाव रॅली’ व्हर्चुअल सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या कृषी कायद्यांविरोधात गुरुवारी (दि. ५) जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने ट्रेकटर रॅलीचे आयोजन केले आहे. निर्माण चौक येथून सुरुवात होणाऱ्या या रॅलीचे सांगता दसरा चौक येथे होणार आहे. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार, माजी आमदार, तालुकाध्यक्ष व विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.